Mumbai Local Train Update : मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या आणि लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठटी मोठी बातमी आहे. प्रवाशांनी व चाकरमान्यांनी येत्या शुक्रवारी (२४ जानेवारी) आणि शनिवारी (२५ जानेवारी) रात्री लवकर कामावरून घराकडे परतावे लागणार आहे. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पूल क्रमांक २० च्या पुनर्बांधणीसाठी दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉकमुळे शेवटच्या लोकलमधील वेळेत बदल करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी व शनिवारी या दोन रात्री मिळून पश्चिम रेल्वेच्या २७७ लोकल रद्द करण्यात येणार आहेत. या दरम्यानच्या ४ एक्सप्रेस देखील रद्द करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे आणि माहीम स्थानकांदरम्यान मिठी नदीवर असलेल्या स्क्रू ब्रीजची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी दोन रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहेत. शुक्रवारी २४ जानेवारी आणि शनिवारी २५ जानेवारीच्या रात्री हे मेगा ब्लॉक असणार आहेत. हा ब्लॉक जलद तसेच धीम्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर एक-एक दिवस घेण्यात येणार आहे.
मिठी नदीवर असलेला हा स्क्रू फाउंडेशन ब्रीज ब्रिटिशांनी भारतात उभारलेला शेवटचा ब्रीज आहे. ब्लॉक कालावधीत उपनगरीय तसेच मेल एक्सप्रेसवर परिणाम होणार आहे. पहिल्या ब्लॉक कालावधीत म्हणजेच २४ तारखेला रात्री १२७ उपनगरीय सेवा रद्द राहतील आणि ६० सेवा अंशतः रद्द राहणार आहेत. तर दुसऱ्या ब्लॉक कालावधीत म्हणजे २५ तारखेला रात्री सुमारे १५० लोकल फेऱ्या रद्द राहतील आणि ९० सेवा अंशतः रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत ४ मेल-एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. १० शॉर्ट टर्मिनेट किंवा ओरिजिनेट आणि २० गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
शुक्रवार व शनिवारी (२४ आणि २५ जानेवारी) वेस्टर्न लाईन अप आणि डाउन धीम्या मार्गांवर रात्री ११ ते सकाळी ८.३० पर्यंत आणि डाउन फास्ट मार्गावर रात्री १२.३० ते सकाळी ६.३० पर्यंत ब्लॉक असेल.
त्याचप्रमाणे डाउन जलद मार्गांवर रात्री ११ ते सकाळी ८.३० पर्यंत आणि अप जलद मार्गावर रात्री ११ ते सकाळी ७.३० पर्यंत ब्लॉक असेल.
संबंधित बातम्या