Mumbai Local Train Updates: कल्याण स्थानकाजवळ आज (२२ जुलै २०२४) सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मात्र, यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कसारा, कर्जतकडे जाणारी लोकल सेवा पूर्ण विस्कळीत झाली. गाड्या वेळापत्रकाच्या मागे धावत असल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सुरुवातीला कल्याणहून निघालेल्या चार गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र, प्रवाशांनी अनेक गाड्या उशीराने धावत असल्याची तक्रार केली. सोमवार हा आठवड्यातील पहिलाच दिवस असल्याने कामावर निघालेल्या प्रवासी संतप्त झाले. कल्याण, डोंबिवली, कोपर, विठ्ठलवाडी, टिटवाळा, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात रेल्वेची वाट पाहून वैतागलेल्या प्रवाशांनी अखेर ओला, उबर यांसारख्या खासगी वाहनांनी प्रवास केला. महिन्याभरात दुसऱ्यांदा लोकल सेवा विस्कळीत होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी भांडुप परिसरात रेल्वे मार्गात पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती.
मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी साचले, रस्त्यावरील सार्वजनिक आणि खासगी वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर मुंबईत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तैनात करण्यात आले. आयएमडीने शहर आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तसेच तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत असून, गेल्या १२ तासांत शहरात झालेल्या पावसामुळे पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन (बेस्ट) बसेसही वळविण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. मुलुंड आणि मलबार टेकड्यांवर सकाळी अवघ्या एका तासात ३४ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत शहरात १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
मुंबई येथील कुर्ला परिसरातील शीतल सिनेमा आणि काळे मार्गाजवळील रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली. त्याचप्रमाणे गोरेगाव पूर्वेकडील आरे मार्गावरील वाहतूक सीप्झ-मरोळ मरोशी-जेव्हीएलआर मार्गे दोन्ही दिशेने वळविण्यात आली होती, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पाऊस सुरूच असून आयएमडीने चंद्रपूरसाठी रेड अलर्ट आणि नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला.
संबंधित बातम्या