गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान साडेचार किलोमीटरचा सहावा मार्ग तयार करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं ३५ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मुंबईतील उपनगरीय प्रवाशांना काही प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.
आज, २७ ऑगस्टपासून हा ब्लॉक सुरू होणार आहे. तो ६ ऑक्टोबरपर्यंत असेल. या ३५ दिवसांच्या कालावधीत वीकेंडला प्रत्येकी १० तासांचे पाच मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. प्रवाशांची कमीत कमी गैरसोय होईल असं पाहून पायाभूत सुविधांचं हे अद्ययावतीकरण पूर्ण करण्याचं रेल्वे प्रशासनाचं उद्दिष्ट आहे.
सहाव्या मार्गिकेचं काम ३५ दिवसांत पूर्ण होणार आहे. या कालावधीत गणेशोत्सव आहे. त्यामुळं गणपती उत्सवाच्या काळात ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत कोणतंही काम हाती घेतले जाणार नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोककुमार मिश्रा यांनी दिली.
मालाड स्थानकाच्या पूर्वेला सहावी मार्गिका टाकण्यासाठी जागा नसल्यानं पश्चिमेला नवीन लाइन टाकण्यात येणार आहे. सध्याच्या सर्व पाच लाईन कट अँड कनेक्शनद्वारे पश्चिमेकडं हलविण्यात येणार आहेत. या कामामुळं लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात १५ ते २० मिनिटांचा बदल होईल, तर उपनगरीय रेल्वे सेवेवरही परिणाम होणार असून सरासरी १०० ते १४० फेऱ्या रद्द होणार आहेत. आठवड्याच्या शेवटी सुमारे ४० फेऱ्या कमी केल्या जातील.
कामाच्या दिवसात कमीत कमी व्यत्यय यावा यासाठी पश्चिम रेल्वेनं रात्रीच्या वेळेत हे काम करण्याचं ठरविलं आहे. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान पाचव्या मार्गावर नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येणार असून, वांद्रे टर्मिनसहून धावणाऱ्या गाड्यांचं २८-२९ सप्टेंबर आणि ५ ते ६ ऑक्टोबर दरम्यान ४० ते ४५ मिनिटे नियमन करण्यात येणार आहे.
वांद्रे टर्मिनस दरम्यान पाचव्या मार्गाचं काम सुरू करण्यात आलं आहे. खार ते गोरेगाव दरम्यान सहावा मार्गाचं काम सुरू आहे. हेच काम पुढं गोरेगाव ते कांदिवली असं करण्यात येणार आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर सहाव्या मार्गिकेचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी डेडिकेटेड कॉरिडॉर उपलब्ध करून दिला जाणार आहे. क्षमता वाढल्यानं गर्दी कमी होऊन वेळापत्रक सुरळीत होऊन प्रवाशांना फायदा होणार आहे.