Mumbai Local Trains News: कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूकदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. परिणामी, जलद आणि धीम्या दोन्ही मार्गावरील गाड्या उशीराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाल्याने स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूकदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने आज सकाळपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या उशीराने धावत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, जलद आणि धीम्या दोन्ही मार्गावरील गाड्या उशीराने धावत आहेत. परिणामी, कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, ऑफिस, शाळा- महाविद्यालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत.
मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमधून दररोज ७.५ दशलक्षांहून अधिक प्रवाशी ये-जा करतात. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेतर्फे चालविण्यात येणाऱ्या लोकल गाड्या मुंबईच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यावश्यक आहेत, ज्यामुळे रहिवाशांना आपल्या निश्चितस्थळी जाण्यास मदत होते. मात्र, गेल्या काही वर्षात मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे.
मंगळवारी सायंकाळी अंधेरी आणि कांदिवली स्थानकांदरम्यान पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. परिणामी, अनेक उपनगरीय गाड्या वळण्यात आल्या. जवळपास तासभराने समस्येचे निराकरण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. दरम्यान, या कालावधीत प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल मध्ये रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली.
संबंधित बातम्या