कामावरून सुटण्याच्या वेळेसच तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ झाली आहे. मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान ओव्हर हेड वायरवरील तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा मंदगतीने सुरू झाली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दोन तासांनी तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर आता मध्य मार्गावरील सेवा पूर्ववत झाली आहे.
मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास कल्याण- ठाकुर्ली मार्गावर तांत्रिक बिघाड झाला. या घटनेमुळे धीम्या मार्गावरील वाहतूक विलंबाने सुरू होती, काही लोकल डोंबिवली, कल्याण मार्गावर थांबून होत्या. यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.
नेमका बिघाड काय हे समजू शकले नाही. कोणी ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड म्हणाले तर कोणी सिग्नल फेल असल्याचे म्हटले. रेल्वेकडून त्यास दुजोरा मिळाला नाही. त्या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंतची लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडल्याने त्याचा त्रास चाकरमान्यांना झाला.
लोकलचा खोळंबा झाल्याने अनेक प्रवाशांनी ट्रॅकवरून चालत जाऊन कल्याण स्टेशन गाठलं. दोन तासानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. मात्र या घटनमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते.
मध्य रेल्वेवरील धिम्या मार्गावर दोन तास वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याणच्या दिशेने स्लो ट्रॅकने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, दोन तासानंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला.
कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवासी ट्रेनमध्येच अडकून बसले. दुसरीकडे सेवा पूर्ववत झाल्यानंतर रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.