मुंबईत मध्य व हार्बर मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. शुक्रवारी एक्स्प्रेसच्या धडकेत एका मोटरमनचा मृत्यू झाला होता. मात्र मोटरमनच्या संघटनांनी ती आत्महत्या असल्याचा दावा केला आहे. या मोटारमनच्या अंत्ययात्रेला त्याचे सहकारी गेल्याने मुंबईतील लोकल सेवा कोडमडली आहे. १०० हून अधिक लोकलफेऱ्या रद्द केल्याचे वृत्त असून ऐन गर्दीच्या वेळेत आणखी लोकल रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पावसाळ्यात पाणी साचल्यावर किंवा तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र आज एका वेगळ्याच कारणामुळे लोकल सेवेचा बोजवारा उडाला असून अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वे प्रशासनावर आली आहे. काल (शुक्रवार) एका मोटरमनचा मृत्यू झाला होता. त्याच्या अंत्यविधीला अन्य मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी गेल्याने अपुऱ्या मनुष्यबळामुळे लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळे मुंबईकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुरलीधर शर्मा या मोटरमनचा सँडहर्स्ट स्टेशनजवळ एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाला होता. रेल्वेचा रेड सिग्नल त्याने तोडला होता. यामध्ये कारवाई होईल म्हणून त्याने सँडहर्स्ट स्टेशन दरम्यान आत्महत्या केल्याचा दावा सहकाऱ्यांनी केला होता. तर रेल्वेने त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्याच्या अंत्यविधीला त्याचे सहकारी गेल्याने व ते तत्काळ परत येणार नसल्याने रात्रीपर्यंत आणखी लोकल रद्द कराव्या लागण्याची शक्यता आहे.
मुरलीधर शर्मा या मोटरमनच्या मृत्यूचा निषेध म्हणून अन्य मोटरमननी डबल ड्युटी करण्यास नकार दिला आहे. यामुळे सात वाजल्यापासून लोकल सीएसएमटी स्थानकात खोळंबलेल्या आहेत.