Mumbai Local Train : सिग्नलमधील तांत्रिक बिघाडामुळं मुंबईत मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Train : सिग्नलमधील तांत्रिक बिघाडामुळं मुंबईत मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल

Mumbai Local Train : सिग्नलमधील तांत्रिक बिघाडामुळं मुंबईत मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल

Feb 04, 2025 10:00 AM IST

Mumbai Local Train News : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुंबई लोकल सेवा मंगळवारी सकाळी विस्कळीत झाली. त्यामुळं प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

तांत्रिक बिघाडामुळं मुंबईत मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल
तांत्रिक बिघाडामुळं मुंबईत मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल

Central Railway News : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तासाभरानंतर बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी या मार्गावरील गाड्या उशिरानं धावत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान पहाटे पावणेचार वाजता सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्याचा फटका लोकल सेवेला बसला. उपनगरीय गाड्या किमान १५ ते २० मिनिटे उशिरानं धावत होत्या.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. बिघाड झाल्यानंतर तासाभरानंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सिग्नल बसविण्यात आला. त्यानंतर लोकल सेवा सुरळीत झाली, असं त्यांनी सांगितलं. 

आजच्या गोंधळामुळं मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या आणि मुख्य मार्गावरील स्थानकांवर गर्दी वाढली होती. प्रवाशांना त्रास सहन करावा लागला, अशी माहिती एका प्रवासी कार्यकर्त्यानं दिली.

मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाण्यातील कसारा आणि रायगड जिल्ह्यातील खोपोली आणि कर्जतपर्यंत आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर दररोज सुमारे १८०० लोकल सेवा चालवल्या जातात. मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि बेलापूर-उरण उपनगरीय मार्गांवर दररोज ३५ लाखांहून अधिक प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. 

लोकलमधील अंतर ३ ते २ मिनिटांपर्यंत कमी करणार

मुंबईतील उपनगरीय लोकलमधील अंतर सध्याच्या १८० सेकंद (३ मिनिटे) वरून १२० सेकंद (२ मिनिटे) केलं जाईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. वंदे भारत रेकमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून लोकल ट्रेनमधील व्हेंटिलेशन आणि वातानुकूलन सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं वैष्णव यांनी मुंबई भेटीच्या वेळी पत्रकारांना सांगितलं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर