मुंबई लोकलमध्ये एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपीने वडिलांसोबत प्रवास करत असलेल्या १५ वर्षीय मुलीसोबत लैंगिक चाळे केल्याचा तसेच तिचे जबरदस्तीने चुंबन घेण्याच्या प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या वडिलांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरोपीला मारायला सुरूवात केली. लोकलमधील अन्य प्रवाशांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरोपीची चांगलीच धुलाई केली आहे.
अहमद नूर असे आरोपीचे नाव असून प्रवाशांच्या मारहाणीत तो जखमी झाला होता. पोलिसांना आरोपीला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला अटक केली आहे. आरोपी कामाठीरपुरा भागातील रहिवासी आहे.
ही घटना रविवारी (३१ मार्च) रोजी घडली आहे. पीडित मुलगी टीबी रोगाने ग्रस्त असून ती वडिलांसोबत वाडिया रुग्णालयात गेली होती. रात्री ८.२३ वाजता दोघे दादरहून जोगेश्वरीला जाण्यासाठी बोरीवली-फास्ट ट्रेनमध्ये चढले. पीडितेने गेल्या वर्षी १० वीची परीक्षा पास झाली आहे. ट्रेनमध्ये ती व तिचे वडील समोरासमोर बसले होते. आरोपी मुलीच्या शेजारी जाऊन बसला.
ट्रेन वांद्रेत पोहोचल्यानंतर आरोपीने अचानक मुलीच्या गळ्यात हात टाकला व तिला मिठ्ठी मारण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या वडिलांनी व अन्य प्रवाशांनी त्याला बाजुला सरकण्यास सांगितले, मात्र तो मुलीच्या चेहऱ्यासमोर उभा राहून तिला किस करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर त्याला पकडले व त्याची यथेच्छ धुलाई करण्यात आली. ट्रेन अंधेरीत पोहोचल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीचे वडील व अन्य लोकांनी त्याला पकडून ठेवले. त्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी जखमी असल्याने त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले.
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस निरीक्षक मोनाली घर्टे यांनी सांगितले की, आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असून काही वर्षापूर्वी तो मुंबईत आला होता व कमाठीपुरामध्ये रहात आहे. तो व्यसनी असून रस्त्याकडेला कपडे विकण्याचा व्यवसाय करतो. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५४ (विनयभंय) आणि ३५४ (ए) (लैंगिक शोषण) तसेच अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.