Central Railway Megablock In Mumbai : स्वातंत्र्यदिन जवळ आलेला असल्यामुळं मुंबईतील अनेक लोकांनी वीकेंडला बाहेर फिरण्याचा प्लॅन केला आहे. कामानिमित्तानं किंवा फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण आता वीकेंडलाच मुंबईत रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेकडून रविवारी म्हणजेच उद्या सेंट्रल आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच हार्बर लाईनवर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईतील सेन्ट्रल रेल्वे मार्गावर माटुंगा आणि मुलुंड या स्थानकांदरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यानच्या धीम्या मार्गावरील वेगवेगळ्य स्थानकांवर थांबवण्यात येणार आहे. तसेच ठाण्यातून सकाळी १०.५० ते ३.४६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या सर्व लोकल गाड्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर थांबवण्यात येणार आहे. या रेल्वे माटुंगा अप जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहे. या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटांच्या उशीराने धावणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील हार्बर लाइनवर सकाळी ११.१५ ते ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मानखुर्द आणि नेरुळ अप आणि डाउन मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. परिणामी सीएसटीहून सकाळी १०.१८ ते ३.२८ वाजेपर्यंत हार्बर मार्गावर सुटणाऱ्या सर्व लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. वाशी-बेलापूर-पनवेलसाठी येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकलही रद्द करण्यात आल्या आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सीएसटी ते मानखुर्द स्टेशन पर्यंत विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे.