Mumbai Local News: मुंबईच्या (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथे प्लॅटफॉर्म २ मध्ये प्रवेश करत असताना पनवेल- सीएसएमटी लोकल ट्रेनचा (Panvel- CSMT Local Train) डबा रुळावरून घसरल्याने घसरल्याने हार्बर मार्गावरील सेवा ठप्प (Harbour Line Services Disrupted) झाली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हार्बर लाईन सेवेतील व्यत्ययामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास पनवेल- सीएसएमटी ट्रेनचा डबा घसरला. परिणामी, सीएसएमटी ते वडाळा दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. गेल्या अर्धा तासापासून सीएसएमटी स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्वच लोकल सेवा स्थगित करण्यात आल्या. लोकलचा वेग कमी असल्यामुळे कोणत्याही प्रवासाला दुखापत झाली नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. महत्त्वाचे म्हणजे, हार्बर लाईन सेवेतील व्यत्ययामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही.
हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हार्बर लाईनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याच तिकीटाचा वापर करून मेनलाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मध्य रेल्वेच्या पनवेल ते कळंबोळी विभागात एका मालगाडीचे पाच डबे खाली घसरल्याची घटना घडली होती. अपघातग्रस्त मालगाडी पनवेलहून वसईकडे जात असताना हा अपघात घडला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, या अपघातामुळे मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. ही घटना ३० सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.