Viral Video: तुम्हीही लोकलमधून 'असा' प्रवास करता, मग आजपासूनच बंद करा; पाहा तरुणासोबत काय घडलं?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: तुम्हीही लोकलमधून 'असा' प्रवास करता, मग आजपासूनच बंद करा; पाहा तरुणासोबत काय घडलं?

Viral Video: तुम्हीही लोकलमधून 'असा' प्रवास करता, मग आजपासूनच बंद करा; पाहा तरुणासोबत काय घडलं?

Updated Jul 26, 2024 03:44 PM IST

Mumbai Local Trains Accident Video: जीव धोक्यात घालून मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई लोकल अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकल अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (ANI)

Mumbai Local Viral Video: मुंबईत दररोज दहा जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू होत असल्याचा दावा केला जातो. मात्र, तरीही अनेकजण स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवास करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एका तरुणाला मुंबई लोकलच्या बाहेर लटकून प्रवास करणे महागात पडले आहे. लोकल भरगच्च भरली असल्याने संबंधित तरुणाने बाहेर लटकून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हात सटकल्याने तो खांबाला धडकला आणि खाली पडला, या घटनेचा व्हिडिओ बाजूने जाणाऱ्या एक्स्प्रेसमधील लोकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला. हा तरुण विचित्र अपघातातून वाचला आहे की नाही हे अद्याप समोर आले नाही.

व्हायरल झालेला व्हिडिओ मुंबईच्या सेंट्रल लाईनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई लोकलसोबत एक एक्सप्रेस ट्रेनही जात होती. एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बसलेले लोक लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. दरम्यान, लोकलच्या एका छोट्याशा जागी चार मुले लटकलेली दिसली. मात्र, काही वेळाने चारपैकी एका मुलाने हात हलवण्याचा प्रयत्न करताच तो एका खांबाला धडकला आणि चालत्या ट्रेनमधून पडला.

व्हिडीओ शेअर करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, 'कुटुंब चालवण्यासाठी नोकरीची गरज आहे. नोकरी वाचवण्यासाठी ऑफिसला वेळेवर जावे लागते. ऑफिसला जाण्यासाठी ट्रेन पकडावी लागते. उशीर होऊ नये ल म्हणून आपला जीव धोक्यात घालावा लागतो. कारण जीवनापेक्षा कुटुंब महत्त्वाचे आहे.'

या घटनेवर प्रतिक्रिया देताना एका युजर्सने म्हटले आहे की, गर्दी असूनही लोक पुढील लोकलची वाट पाहत नाहीत. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'या घटनेला फक्त सरकार जबाबदार आहे का, आमची काही जबाबदारी नाही का? कॉलेजच्या दिवसांपासून मी ट्रेनने प्रवास करायचो. तेव्हाही परिस्थिती अशीच होती. एक तास आधी घर सोडा. काही लोक मनोरंजनासाठी असे स्टंट करतात.'

मुंबई लोकल अपघाताच्या संख्येत वाढ

गर्दी असलेल्या गाड्यांमधून पडून किंवा रुळावरील इतर अपघातांमुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. लोकल गाड्यांच्या संख्या वाढवूनही लोकल अपघातांची संख्या कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्यावर्षी डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ४०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, ८०० हून अधिक लोकल प्रवासी जखमी झाले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर