मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Mega Block: रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक पाहा

Mumbai Mega Block: रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक पाहा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 19, 2024 10:50 PM IST

Mumbai Local MegaBlock : रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा मध्य व हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

local megablock
local megablock

रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २१ जानेवारी २०२४ रोजी रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे विकेंडच्या दिवशी घराबाहेर पडण्याचे नियोजन करत असाल तर मुंबईतील लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. 

रविवारी २१ जानेवारी रोजी लोकल रेल्वेच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मुलुंड ते माटुंगा दरम्यान ब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 

मध्य मार्गावरील मेगाब्लॉक - 

मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. या मार्गावरील लोकल नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक -

कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी  सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. 

रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तसेच या प्रवाश्यांना देखील वेळापत्रक पाहूनच घरातून बाहेर पडण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलीय.

WhatsApp channel