Mumbai Local : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकल ट्रेनचा बोजवारा, प्रवाशांचे प्रचंड हाल!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकल ट्रेनचा बोजवारा, प्रवाशांचे प्रचंड हाल!

Mumbai Local : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकल ट्रेनचा बोजवारा, प्रवाशांचे प्रचंड हाल!

Jan 26, 2025 10:31 AM IST

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकल ट्रेनचा बोजवारा, प्रवाशांचे प्रचंड हाल
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकल ट्रेनचा बोजवारा, प्रवाशांचे प्रचंड हाल (HT)

Mumbai Local News: कर्नाक पुलावर गर्डर बसवण्यासाठी रेल्वकडून रात्रीचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला. परंतु, काम अद्यापही न संपल्याने मुंबईची लाईफलाइन म्हटली जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मेगाब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबलेली असून पश्चिम रेल्वेची वाहतूक उशीराने सुरू आहे. एवढेच नव्हेतर, लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्या दादर, भायखळा आणि वडाळा इथपर्यंत धावत आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना रिक्षा किंवा बसने प्रवास करावा लागत आहे.

कर्नाक पुलावर गर्डर बसवण्यासाठी रात्रीचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता, जो आज पहाटे ५.३० वाजेपर्यंत सुरू असेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. मात्र, गर्डर बसवण्याचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने तिन्ही मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरून सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या काही लोकल परळपर्यंतच सुरू आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी जाणाऱ्या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना इच्छित ठिकाणी पोहोचायला उशीर होत आहे. दादर स्टेशन परिसरात लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या आहेत.

हार्बर लोकल सेवेवर परिणाम

सकाळी ५ वाजून ०६ मिनिटांनी निघणारी रेल्वे ६ वाजता जीटीबी रेल्वे स्थानकात पोहचली. मात्र, जीटीबी ते वडाळादरम्यान वारंवार सिग्नल मिळाल्याने ६ वाजून ०६ मिनिटांनी वडाळ्याला पोहोचणारी लोकल तब्बल ५० मिनिटे उशिरा म्हणजे ६ वाजून ५६ मिनिटांनी उशिराने वडाळा रेल्वे स्थानकात पोहोचली. वडाळा रेल्वे स्थानकावर हार्बर मार्गावरील सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या वडाळापर्यंत चालविण्यात येतील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

पश्चिम रेल्वे सेवाही उशीराने

या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवाही उशीराने सुरू आहे. चर्चगेटसाठी गाडी नसल्याने अंधेरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. चर्चगेटच्या दिशेने जाणारी ट्रेन अंधेरी रेल्वे स्थानकापर्यंतच धावत आहे. ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मध्य रेल्वेने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या ११ लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. तर, सीएसएमटीला येणाऱ्या नऊ गाड्या त्यांच्या नियोजित गंतव्यस्थानापूर्वीच थांबवण्यात आल्या. गर्डर बसवताना एका कामगाराला दुखापत झाल्याची बातमीही आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सीएसएमटी, दादर, भायखळा आणि वडाळा रोड येथे प्रवाशांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य रेल्वे दररोज उपनगरीय नेटवर्कवर लांब पल्ल्याच्या गाड्यांव्यतिरिक्त सुमारे १,८०० लोकल ट्रेन सेवा चालवते, ज्यातून सुमारे ३७ लाख प्रवासी प्रवास करतात, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर