Mumbai railway megablock on sunday : उद्या रावीवर असल्याने अनेक मुंबईकर घराबाहेर सुट्टीच्या आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडण्याचा प्लॅन करत असतात. मात्र, उद्या रविवारी त्यांच्या सुट्टीच्या प्लॅनवर विरजण पडणार आहे. कारण मध्य रेल्वेने काही मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान व हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी या दोन स्थानकांदरम्यान हा मेगाब्लॉक घेतला जाणार असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी ११.५ ते दुपारी ३.५५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून माटुंगा ते मुलुंड या दोन स्थानकादरम्यान धिम्या मार्गावरील सेवा ही जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. या मार्गावरील गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांवर थांबा घेतील. त्यानंतर, या गाड्या पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. या ब्लॉक काळात रेल्वे सेवा ही १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर मार्गावर देखील मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान हा ब्लॉक राहणार आहे. उद्या रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बेलापूर, वाशी या रेल्वे सेवा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढणार असून त्यांना पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा लागणार आहे.
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय सेवा चालविल्या जाणार आहेत. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे, वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे.