Viral Video : हे फक्त विश्वगुरू भारतातच घडू शकतं! मुंबई लोकल ट्रेनच्या व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या भन्नाट कमेंट्स-mumbai local madness mans struggle to exit goes viral on social media ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video : हे फक्त विश्वगुरू भारतातच घडू शकतं! मुंबई लोकल ट्रेनच्या व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या भन्नाट कमेंट्स

Viral Video : हे फक्त विश्वगुरू भारतातच घडू शकतं! मुंबई लोकल ट्रेनच्या व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या भन्नाट कमेंट्स

Aug 06, 2024 05:31 PM IST

Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकलमधून खाली उतरण्यासाठी एक व्यक्ती करत असलेला जीवघेणा संघर्ष सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधून उतरतानाची जीवघेणी धडपड व्हायरल, लोक म्हणतात, हे फक्त विश्वगुरू भारतातच घडू शकतं!
Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधून उतरतानाची जीवघेणी धडपड व्हायरल, लोक म्हणतात, हे फक्त विश्वगुरू भारतातच घडू शकतं!

Mumbai Local Train Viral Video : लोकल ट्रेन ही मुंबईची लाइफलाइन समजली जाते. ही लाइफलाइन जराही विस्कळीत झाली तरी दाणादाण उडते. दररोज लाखो लोक मुंबईत पश्चिम व मध्य रेल्वेनं प्रवास करत असतात. मुंबईत फिरण्याचा हा स्वस्त आणि सोपा मार्ग असला तरी या लोकल ट्रेनमध्ये चढणं आणि उतरणं हे एक आव्हान असतं. लोकल ट्रेनचा प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला हे आव्हान पेलावं लागतं. 

हे आव्हान पेलताना अनेकदा दमछाक होते, भांडणं होतात, शिवीगाळ होते. कधी हाणामारीही होते. मात्र हे सगळं सहन करत मुंबईकरांचा प्रवास सुरू असतो. हा संघर्ष किती जीवघेणा असतो याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईत स्टेशनात ट्रेन पूर्ण थांबण्याआधीच चढण्या-उतरण्याची लगबग सुरू होते. आतले उतरण्याआधीच बाहेरचे लोक गाडीवर झडप घालतात. त्यामुळं उतरणाऱ्यांची कोंडी होते. सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ अशाच एका श्रमिकाचा आहे. ही व्यक्ती ट्रेनमधून स्टेशनवर उतरू पाहत आहे. मात्र, गाडीत घुसणाऱ्या गर्दीच्या लोंढ्यामुळं त्याला उतरताच येत नाही. ट्रेन सुटेल म्हणून हा माणूस जिवाच्या आकांतानं लोकांना बाजूला करत आहे. शेवटी धक्काबुक्की आणि मारहाणीचा आधार घेतो. या सगळ्या प्रयत्नानंतर तो उतरतो खरा, पण तोल जाऊन जमिनीवर पडतो, हे या व्हिडिओत दिसत आहे.

पाहा व्हिडिओ

ही पोस्ट ५ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून त्याला ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, ४ हजार लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

एक व्यक्ती म्हणतो, ‘लोक गुदमरतात, शिवीगाळ करतात, इतरांना दूर ढकलतात, लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी भांडतात. हे फक्त विश्वगुरू भारतातच घडते.’

आणखी एक नेटिझन मंदा बेंद्रे म्हणतात की, ‘ही जवळपास रोजचीच गोष्ट आहे. ह्यात कुणाला संयम आणि स्पिरीट दिसत असेल, पण खरंतर हा 'पापी पेट का सवाल’ आहे.

'या देशातील जनता अशा पद्धतीनं चिरडली जाऊनही शांत आणि संयमी कशी राहते, हे माझ्या आकलना पलीकडचं आहे,' अशी खोचक टिप्पणी एकानं केली आहे.

शंकर राव बठूला नावाचा एक X युजर म्हणतो की, 'तुम्ही मुंबईला गेलात तर प्रत्येक लोकल ट्रेन अशीच दिसते, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.'

दुसरा एक नेटकरी म्हणतो की, ‘मुंबई लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी कमांडो ट्रेनिंगची गरज लागते.’