Mumbai Car Fire Video: मुंबईतील कोस्टल रोडवर धावत्या लॅम्बोर्गिनी कारला आग लागल्याची घटना घडली.रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजून २० मिनिटांनी घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेबाबत सिंघानिया यांनी लॅम्बोर्गिनी कारच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
गौतम सिंघानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केशरी रंगाची लॅम्बोर्गिनी कार जळताना दिसत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये गौतम सिंघानिया यांनी लिहिले की, मुंबईतील कोस्टल रोडवर मला लॅम्बोर्गिनी कार जळताना दिसली. यासारख्या घटनांमुळे लॅम्बोर्गिनीच्या विश्वासार्हता आणि सुरक्षा मानकांबद्दल गंभीर चिंता निर्माण होते. किंमत आणि प्रतिष्ठेसाठी कोणतीही तडजोड न करणाऱ्या निर्मात्यांकडून चांगल्या दर्जाची अपेक्षा आहे, संभाव्य धोका नाही.' सिंघानिया यांनी लॅम्बोर्गिनी खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करण्यास सांगितले.
लक्झरी कारला आग लागल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईतील कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनी कारला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे ४५ मिनिटांत आग आटोक्यात आली. ही आग नेमके कशामुळे लागली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेले नाही.सुदैवाने, या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
या आगीच्या घटनेनंतर लॅम्बॉर्गिनी कार निर्माता कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवरून स्पष्टीकरण दिले. ग्राहकांच्या सुरक्षेची लॅम्बोर्गिनीची जबाबदारी वर्षानुवर्षे कायम आहे. ग्राहकांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड केली जात नाही. लॅम्बोर्गिनी मॉडेल्सच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात.
संबंधित बातम्या