Kurla Accident News: मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एस. जी. बर्वे मार्गावर सोमवारी (०९ ऑक्टोबर २०२४) रात्री साडेनऊच्या सुमारास बेस्ट बसने अनेक गाड्यांना धडक दिली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर, ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. तसेच बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, स्वत: बसचालकाने या अपघातामागचे कारण सांगितले आहे.
संजय मोरे (वय, ५०) असे अटक करण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे. मुंबई दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू असल्याने संजय मोरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीदरम्यान संजय मोरे याने १ डिसेंबर रोजी नेमलेल्या इलेक्ट्रिक बसच्या स्वयंचलित ट्रान्समिशनमुळे अस्वस्थ असल्याचे सांगितले. याआधी संजय मोरे मॅन्युअल ट्रान्समिशन बस चालवत होते. ऑटोमॅटिक वाहनात क्लच नसल्यामुळे गाडी चालवताना गोंधळ झाल्याची माहिती त्याने दिली.
अपघातानंतर पोलिसांनी संजय मोरे यांना वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले. सध्या सुरू असलेल्या तपासाचा एक भाग म्हणून अधिकारी संभाव्य यांत्रिक बिघाड आणि ड्रायव्हर त्रुटीसह विविध घटकांची तपासणी करीत आहेत. बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने वाहनावर नियंत्रण ठेवू शकला नाही, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला.
अवघ्या १०० मीटरचा प्रवास केल्यानंतर बसने रस्त्याच्या चुकीच्या बाजूने जाणाऱ्या दुचाकी आणि दोन रिक्षांसह वाहनांना धडक दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. वाहनांना धडक देऊनही चालकाला बसवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि त्याने इतर अनेक पादचारी आणि वाहनांना धडक दिली.अखेर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल-वॉर्ड कार्यालयाजवळील डॉ. आंबेडकर नगर गृहसंकुलाच्या गेटवर बस थांबली.
बसचालकाला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. जखमींवर भाभा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलसह अनेक रुग्णालयात उपचार सुरू आहेत, यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींमध्ये घटनेच्या वेळी बंदोबस्तावर असलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ (सदोष मनुष्यवधाची शिक्षा) आणि ११० (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे चाकांवरील नियंत्रण सुटल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, तज्ज्ञांकडून याचा शोध घेतला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
संबंधित बातम्या