Mumbai Rape: मुंबईतील कांदिवली येथील एका शाळेतील शिक्षकावर ११ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुलै महिन्याच्या अखेरीस घडली. मात्र, इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने बुधवारी (१४ ऑगस्ट २०२४) शाळेच्या मुख्याध्यापकांना घटनेची माहिती दिल्यानंतर शिक्षकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु, इतक्या दिवस पीडिताने याबाबत कोणालाही कसे सांगितले नाही, आरोपी शिक्षकाने तिला कोणत्या प्रकारची धमकी दिली होती का? याचाही तपास केला जात आहे.
कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने आपल्या मुख्याध्यापकांना सांगितले की, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वर्ग सुटल्यानंतर आरोपी शिक्षकाने तिला हाक मारली होती. त्यानंतर मुख्याध्यापिकेने मुलीच्या पालकांना माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी आरोपीला जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे. आम्ही मुख्याध्यापक आणि मुलीच्या पालकांचे जबाब नोंदवले असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत. आरोपांची सत्यता शोधण्यासाठी आम्ही शाळेतील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहोत, असे कांदिवली पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
वसईतील एका शाळेतील इंग्रजी शिक्षकाला १४ वर्षीय विद्यार्थिनीवर गेल्या पाच महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रविवारी रात्री अटक करण्यात आली. पेल्हार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीला हा छळ सहन न झाल्याने तिने हा प्रकार आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर आरोपी शिक्षिकेला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मार्च २०२४ पासून पीडित मुलीवर अत्याचार सुरू होते. या बाबत कुठेही वाच्यता केल्यास किंवा पालकांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. शुक्रवारी मुलगी ट्युशनवरून घरी परतली असता तिने पोटात आणि प्रायव्हेट पार्टमध्ये दुखू लागले. याबाबत तिच्या आईने पीडिताकडे अधिक चौकशी केली असता तिने आपल्या पालकांना बलात्काराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पेल्हार पोलिसांकडे धाव घेऊन शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला.
पीडिताच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२) (एफ) (संमती न देणाऱ्या महिलेवर बलात्कार करणे) आणि ६५ (१) (काही प्रकरणांमध्ये बलात्कारासाठी शिक्षा) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पॉक्सो) संबंधित कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला.