Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी इन्कम टॅक्सचा छापा, काय आहे प्रकरण?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी इन्कम टॅक्सचा छापा, काय आहे प्रकरण?

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी इन्कम टॅक्सचा छापा, काय आहे प्रकरण?

Feb 08, 2024 04:58 PM IST

Income Tax Raid at Pradeep Sharma House : माजी पोलीस अधिकारी व अँटिलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांच्या घरी प्राप्तिकर खात्यानं छापा टाकला आहे.

Income Tax raid at Pradeep Sharma house
Income Tax raid at Pradeep Sharma house

Income Tax Raid at Pradeep Sharma House : करचुकवेगिरीचा आरोप असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज छापा टाकला. शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी इथल्या घरी जाऊन अधिकाऱ्यानी झाडाझडती घेतली. छाप्यामध्ये नेमकं काय हाती लागलं याची माहिती मिळू शकलेली नाही. 

‘एनकाउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शर्मा यांना मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर ते सध्या बाहेर आहेत. आता आयकर विभागाच्या छाप्यामुळं ते पुन्हा अडचणीत आले आहेत.

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी जिलेटिननं भरलेली एक एसयूव्ही कार मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीजवळ आढळली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ५ मार्च रोजी अँटिलिया जवळ आढळलेल्या एसयूव्हीचा मालक हिरेन याचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत आढळला होता.

राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) या प्रकरणाचा तपास केला. या तपासातील माहितीच्या आधारे जून २०२१ मध्ये शर्मा यांना अटक करण्यात आली होती. अंबानी कुटुंबीयांना धमकावण्याच्या कटात सहभागी असलेल्या मनसुख हिरेनला संपवण्यासाठी सचिन वाजे याला प्रदीप शर्मानं साथ दिल्याचा एनआयएचा दावा होता.

माजी आमदार घनश्याम दुबे यांच्या घरावरही छापे

प्रदीप शर्मा यांच्याबरोबरच प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी माजी आमदार आणि व्यापारी घनश्याम दुबे यांच्या घराचीही झडती घेतली. बनावट कागदपत्रांचा वापर करून जमीन हडप केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गेल्या वर्षी दुबे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. दुबे यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर हरी प्रसाद आणि भदोही तहसीलचे माजी उपनिबंधक यांच्याविरुद्ध देखील याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा हे माजी पोलीस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस दलात असताना त्यांनी संघटित गुन्हेगारी विरुद्ध आघाडी उघडली होती. मुंबई पोलिसांनी केलेल्या अनेक एन्काऊंटरमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवायांमध्ये ११२ गुंड मारले गेल्याचं बोललं जातं. त्यामुळंच त्यावेळी ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जायचे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं त्यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. अलीकडच्या अँटिलिया स्फोटक प्रकरणात त्यांना अटक झाली होती. दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर