human finger in ice cream cone : मुंबईतील एका डॉक्टर तरुणाला आइसक्रीमच्या कोनमध्ये माणसाचं तुटलेलं बोट आढळल्याच्या घटनेची देशभरात चर्चा झाली होती. या प्रकरणाची दखल घेऊन मुंबई पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला होता. आता मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती आली आहे. हे तुटलेलं बोट आइसक्रीमच्या कारखान्यातील कर्मचाऱ्याचं असल्याचा संशय आहे.
मुंबईतील मालाड पश्चिम येथील एका २६ वर्षीय डॉक्टर ब्रेंडन फेराव यानं काही दिवसांपूर्वी ऑनलाइन बटरस्कॉच आइसक्रीम मागवलं होतं. युमो कंपनीचं हे आइसक्रीम खात असताना ब्रेंडनला त्यात एक कडक तुकडा लागला. ड्रायफ्रूट्सचा एखादा तुकडा असावा असं सुरुवातीला त्याला वाटलं. मात्र बारकाईनं पाहिलं असता त्याला धक्काच बसला. डॉक्टर असल्यामुळं ही कडक वस्तू माणसाचं तुटलेलं बोट असल्याचं त्याला समजलं.
आइसक्रीममध्ये तुटलेलं बोट आढळल्यामुळं त्याला धक्काच बसला. त्याला किळसही आली. मात्र, हे प्रकरण गंभीर असू शकतं अशी शंकाही त्याला आली. त्यामुळं त्यानं हे बोट तसंच ठेवलं आणि मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली.
ब्रेंडनच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. यातून पोलिसांनी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. हे तुटलेलं बोट आइसक्रीम जिथं बनली, त्या पुण्यातील कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं असल्याचं समोर आलं. या कर्मचाऱ्याच्या बोटाला अपघातात दुखापत झाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी या कर्मचाऱ्याचा अपघात झाला, त्याच दिवशी हे आइसक्रीम पॅक करण्यात आलं होतं.
पोलिसांनी नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवले आहे. डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतरच हे बोट त्या कर्मचाऱ्याचं आहे की नाही याची खातरजमा होणार आहे. याशिवाय, बोटाच्या तुकड्याची फॉरेन्सिक तपासणीही केली जाणार आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आधीच युमो आईस्क्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात भारतीय दंड विधान कलम २७२ (विक्रीसाठी असलेल्या खाण्यापिण्यात भेसळ), २७३ (विषारी खाण्यापिण्याची विक्री) आणि ३३६ (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एफएसएसएआय पश्चिम विभाग कार्यालयाच्या पथकानं पुण्यातील त्या आइसक्रीम उत्पादकाच्या परिसराची तपासणी करून त्याचा परवाना निलंबित केला आहे. आइसस्क्रीम डिलिव्हरी करणारी उत्पादक कंपनी पुण्यातील इंदापूर इथं स्थित आहे आणि त्याच्याकडं केंद्रीय परवानादेखील आहे.
संबंधित बातम्या