Dahi Handi 2023 : एकाला परवानगी अन् दुसऱ्याला मनाई कशासाठी?, कोर्टाने पोलिसांना फटकारलं
Dahi Handi 2023 : शिवसेनेच्या एका गटाला परवानगी तर दुसऱ्या गटाला मनाई करत असल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता.
Mumbai High Court On Dahi Handi 2023 : दहीहंडी उत्सवापूर्वी शिवसेनेतील ठाकरे गटाला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण पोलिसांनी शिवसेनेतील एका गटाला दहीहंडीची परवानगी तर दुसऱ्या गटाला मनाई केली होती. त्यानंतर दोन्ही गटांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर अखेर हायकोर्टाने सुनावणी घेत ठाकरे गटाच्या दहीहंडी कार्यक्रमाला रितसर परवानगी देण्याचे आदेश जारी केले आहे. याशिवाय एकाला परवानगी आणि दुसऱ्याला मनाई कशासाठी?, असा सवाल करत हायकोर्टाने कल्याण पोलिसांना चांगलंच झापलं आहे. त्यामुळं आता यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ट्रेंडिंग न्यूज
कल्याणमध्ये शिवसेनेतील दोन्ही गट एकाच ठिकाणी दहीहंडी घेण्यासाठी आग्रही होते. परंतु कल्याण पोलिसांनी ऐनवेळी ठाकरे गटाला परवानगी नाकारत शिंदे गटाला दहीहंडीची परवानगी दिली. त्यामुळं शिवसेनेच्या एका गटाला परवानगी आणि दुसऱ्याला मनाई का?, असा सवाल करत उच्च न्यायालयाने कल्याण पोलिसांना तातडीने भूमिका स्पष्ट करत ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याचे आदेश दिले आहे. याशिवाय कोणत्याही उत्सवांना परवानगी नाकारण्यात येवू शकत नाही, असंही कोर्टानं म्हटलं आहे.
सणोत्सवातील कार्यक्रमांना परवानगी देताना पोलीस कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू शकत नाही. शिवसेनेतील दोन्ही गटांना परवानगी द्या, नाही तर कुणालाच देवू नका. यातून मार्ग निघत नसेल तर दोन्ही गटाच्या आयोजकांना बोलावून मध्यम मार्ग काढा. त्यानंतरची माहिती प्रतिज्ञापत्रावरद्वारे सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोस पुनावाला यांच्या खंडपीठाने याबाबतचे निर्देश दिले आहे. त्यामुळं आता कल्याणमधील शिवसेनेतील दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.