Gokhale Bridge news : अंधेरी येथील गोखले पूल धोकादायक ठरल्याने या पूलाची पुनर्बांधणी करण्यात आली. मात्र, हा पूल कधी सुरू होणार याची प्रतीक्षा मुंबईकरांना होती. अखेर हा पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पहिल्या टप्यात या पूलाची एक मार्गिका सुरू करण्यात आली असून यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या पुलाचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यावर अवजड वाहनांनाही येथून जसोडले जाणार आहे. सध्या या पुलावरील वाहतुकीचे नियोजन मुंबई वाहतूक पोलिस करत असून गर्दीच्या वेळी तीन मार्गिकांवर वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे.
२०२२ मध्ये ७ नोव्हेंबर रोजी हा पूल कमकुवत झाल्याने या पूलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गेल्या वर्षी १ एप्रिल २०२३ पासून या पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. दरम्यान, १४ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत हा पूल पुन्हा उभारण्यात आला आहे. यात रेल्वे प्रशासनाने देखील मोलाचे योगदान दिले आहे. दरम्यान, हा पूल वाहतुकीसाठी कधी सुरू होणार या प्रतीक्षेत नागरिक होते. अखेर सोमवार पासून हा पूल सुरू करण्यात आला आहे.
सध्या पूलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून यामुळे वाहनचालकांना पश्चिम ते पूर्व असा प्रवास करणे शक्य होणार आहे. हा पूल प्रामुख्याने शाळकरी विद्यार्थी, पादचारी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सोईचा ठरणार आहे. सध्या या पूलावरून केवळ हलक्या वाहनांना सोडण्यात येत आहे. या पूलाची दुसरी मार्गिका सुरू झाल्यावर अवजड वाहतुकीचेही नियोजन केले जाणार आहे. या पूलाची ऊंची ही पावणे दोन मीटरने वाढवण्यात आली आहे. हा तांत्रिक दोष नसल्याचे आयआयटी मुंबई, व्हीजेटीआय या संस्थांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत रॅम्प विकसित करण्याबाबतचा अहवाल तयार केला जाणार असून पुलाच्या कामाच्या बाबत कोणताही दोष उद्भवू नये, यासाठी पालिका कटिबद्ध आहे. तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर रॅम्प उभारणीचे काम हाती घेतले जाईल, असे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले.
या पुलाच्या उद्घाटन प्रसंगी दीपक केसरकर म्हणाले, मेट्रो, मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्प यांसाख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईचा वेगाने विकास हॉट आहे. मुंबईत पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी उपसा करण्यासाठी लावलेल्या १६० पंपांमुळे पाण्याचा निचरा वेगाने झाला असून येत्या काळात मुंबईत आणखी आधुनिक सेवा आणि प्रकल्प उभारले जाणार आहे.
संबंधित बातम्या