मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; वडाळा स्टेशन मास्तराकडून झाली मोठी चूक, मोठा अनर्थ टळला!

Mumbai Local: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; वडाळा स्टेशन मास्तराकडून झाली मोठी चूक, मोठा अनर्थ टळला!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jun 09, 2024 02:45 PM IST

Harbour Line News: वडाळा स्टेशन मास्तराच्या एका चुकीमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून गोरेगावच्या जाणारी लोकल वाशीच्या दिशेने निघाली.

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. (PTI)

Mumbai Local Trains: वडाळा स्टेशन मास्तरांच्या एका चुकीमुळे शनिवारी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली. सीएसएमटी स्थानकावरून गोरेगावच्या दिशेने निघालेली लोकल अचानक वाशीच्या दिशेने पुढे जाऊ लागल्याने प्रवाशी चिंतेत पडले. वडाळा स्टेशन मास्तराने चुकीचा सिग्नल दिल्यानंतर हा प्रकार घडला.परिणामी, सीएसएमटी ते वडाळा दरम्यानच्या इतर गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे प्रवाशांना आपल्या ठिकाणी पोहोचण्यात उशीर झाला. स्टेशन मास्तरला मेमो देण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वडाळा स्टेशन मास्तरांनी गोरेगावकडे जाणाऱ्या लोकलच्या चुकीच्या दिशानिर्देशामुळे शनिवारी हार्बर मार्गावरील सेवेला विलंब झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १०.५४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून गोरेगावला जाणारी लोकल २० मिनिटांनी वडाळा रोड स्थानकावर आली. हार्बर मार्गाचे मार्ग वडाळा स्थानकाच्या आधी दोन लाईनमध्ये विभाजित होतात, एक मार्ग वाशीकडे आणि दुसरा मार्ग गोरेगावकडे जातो.ही लोकल गोरेगाव स्थानकावर पोहोचणार होती. मात्र, स्टेशन मास्तरने चुकीचे सिग्नल दाखवल्यामुळे ही लोकल वाशी मार्गावरून पुढे निघाली.

स्टेशन मास्तरांचे स्पष्टीकरण

त्यानंतर मोटरमन आणि गार्डने नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यामुळे सीएसएमटी ते वडाळा दरम्यानच्या इतर गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. काही वेळाने गाडी उलटून योग्य रुळावर नेण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा स्टेशन मास्टरला ट्रेनला सिग्नल देण्याच्या चुकीबद्दल मेमो देण्यात आला होता. स्टेशन मास्तरांनी योग्य वेळापत्रक नसल्यामुळे ही चूक झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग