Mumbai Goa Highway: कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार!-mumbai goa highway will be become pothole free before ganeshotsav says cm eknath shinde ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Goa Highway: कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार!

Mumbai Goa Highway: कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार!

Aug 27, 2024 12:03 AM IST

Mumbai goa highway : पनवेल, पळस्पे येथून या मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली.

 गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार!
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार!

Mumbai Goa Highway : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. रस्ते तसेच रेल्वेमार्गे चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास कमी करण्यासाठी सरकारकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केल्यानंतर हे विधान केले.

पनवेल, पळस्पे येथून या मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली.

खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. पहिली टेक्नॉलॉजी एम ६० आरएफसी आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम ६० पद्धत आणि तिसरी डीएलसी पद्धत या तीन आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट एम ६० या पद्धतीचाही उपयोग करण्यात येत आहे. या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पद्धतीने कुठे काम करायचे, हे आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरू आहे. जे जुने कंत्राटदार काम सोडून गेले, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले.

१५५ किलोमीटर रस्त्याच्या पाहणी दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पळस्पे, गडब, कोलाड, माणगाव, लोणेरे फाटा आणि कशेडी बोगदा या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची भर पावसात पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी या महामार्गावरील रस्त्यांची राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी निर्देश दिले.