Ravindra Chavan on Ramdas Kadam: शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी काल ठाण्यात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले होते. रामदास कदम यांच्या टीकेला रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. मंत्री म्हणून कोकणचे नेतृत्व करणाऱ्या रामदास कदम यांनी गेल्या ४० वर्षात विकास कामांचे कोणते दिवे लावले ते पहिले स्पष्ट करावे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.
डोंबिवलीतील सावरकर उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधनाचा कार्यक्रमात चव्हाण यांनी रामदास कदम यांना लक्ष्य केले. 'मलाही बोलायला येते. बोलायला समोरासमोर या. कोणीही वाचवायला राहणार नाही. एवढे लक्षात ठेवा, कशा भाषेत बोलतात, ते दाखवतो. मी रवींद्र चव्हाण आहे. रवींद्र चव्हाणांसारखे उत्तर देऊ शकतो. पण मी युती धर्म पाळतो. याचा अर्थ नाही की कोणीही काहीही बोलेले आणि मी ऐकून घेईल. असे होणार नाही. तोंड सांभाळून बोला. तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही', असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला.
'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावर जे खड्डे पडले आहेत, त्याकडे मी त्यांचे लक्ष वेधले आहे, चमकोगिरी करण्यापेक्षा आणि शायनिंग मारण्यापेक्षा कामे झाले पाहिजे. अनेक पूल झाले नाहीत, रस्ताच नाही. खड्डेमय रस्ता आहे. नुसता पाहणी दौरा कशासाठी? देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांचा राजीनामा घेतला पाहिजे. हा कुचकामी मंत्री आहे. हे मी युती असतानाही डायरेक्ट सांगतो. कोकणातील लोकांचे हाल पाहवत नाहीत. लोक मला प्रश्न विचारत आहेत', असेही रामदार कदम म्हणाले.
अशा प्रकारचे आरोप करणे, हे कुठल्या युती धर्मात बसते. रामदार कदम यांनी आपले म्हणणे अंतर्गत मांडले पाहिजे. प्रत्येक वेळी भाजप नेत्यांना वेठीस धरणे योग्य नाही. तरी मी रामदार कदम यांचे म्हणणे काय आहे, हे समजून घेईल आणि त्यातून मार्ग काढेल. रामदार कदम असे वारंवार टोकाचे बोलतात. यामुळे आमचे मन दुखावले जातात. शेवटी आम्ही माणसे आहोत. त्याच्या उत्तरावर आम्हाला ५० गोष्टी बोलता येतील. मोठ्या नेत्यांनी पथ्य पाळावे. वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं हे आम्हाला मान्य नाही. याबाबत मी स्वतः एकनाथ शिंदे यांच्या सोबत बोलेल, असे उत्तर त्यांनी रामदास कदम यांच्या टीकेवर दिले.