कोकणवासीयांसाठी खुशखबर! कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला, कोणत्या वाहनांना प्रवेश?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोकणवासीयांसाठी खुशखबर! कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला, कोणत्या वाहनांना प्रवेश?

कोकणवासीयांसाठी खुशखबर! कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला, कोणत्या वाहनांना प्रवेश?

Feb 24, 2024 09:05 PM IST

Mumbai-Goa Highway Kashedi Tunnel : कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांना शिमग्यापूर्वीच आनंदाची बातमी मिळाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा आजपासून एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Mumbai-Goa Highway Kashedi Tunnel
Mumbai-Goa Highway Kashedi Tunnel

शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांना आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा शनिवारी (२४ फेब्रुवारी) पासून एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू होते. कोकणातील शिगमोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना कोकणात दाखल होण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी हा बोगदा खुला करण्यात आला नसून यासाठी कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे. 

सध्या लहान वाहनांना परवानगी देण्यात आली असून एसटी व खासगी आराम बसेसना देखील बोगद्यातून येण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून चाचणी घेऊन अखेर शनिवारपासून मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक ही कशेडी बोगद्यातून  वळवण्यात आली आहे. कशेडी बोगदा हा २ किलोमीटर लांबीचा असून या ठिकाणी ४० किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांनी पाळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

कशेडी बोगद्यात विद्युतीकरणाचे काम केले जात आहे. दोन्ही बाजूचे जोड रस्ते पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मार्च अखेरपर्यंत ते पूर्ण करून दोन्हीही बोगदे वाहतुकीसाठी खुले करण्याचा प्रयत्न असल्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले.

कोकणातील शिमगोत्सवापूर्वी राज्य सरकारने कशेडी बोगदा (Kashedi Tunnel)  किमान एकेरी वाहतुकीसाठी खुला केल्याने कोकणवासीयांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीमध्ये बोगद्यातून वाहतूक मुंबईहून गोव्याच्या दिशेने एकेरी सुरू करण्यात आली होती. त्याचप्रकारे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांना आता परवानगी देण्यात आली आहे. लहान वाहने प्रति तास ४० किलोमीटर वेगाने या बोगद्यातून रायगडमधून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होऊ लागली आहेत. 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर