Mumbai Gas cylinder blast News: मुंबईतील विक्रोळी येथील पार्कसाईट एका झोपडीत शनिवारी रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. धनंजय मिश्रा (वय, ४६) आणि राधेश्याम पांडे असे जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मिश्रा ७० ते ८० टक्के आणि राधेश्याम पांडे ९० ते १०० टक्के भाजले. त्यांना त्वरीत राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान राधेश्याम पांडे यांचा मृत्यू झाला. तर, धनंजय मिश्रा यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
विक्रोळी पूर्वेकडील संजय गांधी नगर येथील झोपडपट्टीतील एका झोपडीत शनिवारी संध्याकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दल येण्यापूर्वीच स्थानिकांनी वीज पुरवठा खंडित करून पाण्याच्या बादल्या घेऊन आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. या आगीत झोपडी जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे. नेमका स्फोट कशामुळे झाला? यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दिल्लीतील फर्श बाजार मध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन चौघांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांना सुमारे एक तास लागला. पाच जणांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी चौघांना मृत घोषित करण्यात आले. कुटुंबातील एक जण भाजला आहे. मुन्नी देवी (४५), त्यांची मुले नरेश (२२), ओम प्रकाश (२०) आणि मुलगी सुमन (१८) अशी मृतांची नावे आहेत. यात त्यांचा नातेवाईक लाल चंद (२९) २५ टक्के भाजला आहे.
स्फोटामुळे छताचा काही भाग कोसळला आणि घराला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने घराच्या खिडक्या आणि दरवाजे तोडून पाचही सदस्यांची सुटका केली. त्यानंतर कॅट्स अॅम्ब्युलन्सने त्यांना डॉ. हेडगेवार रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यापैकी चौघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले,' अशी माहिती पोलिसांनी दिली. घराच्या समोरच्या भागात गॅस स्टोव्ह दुरुस्तीचे दुकान होते. गॅस स्टोव्ह दुरुस्ती दुकानाचा मालक आणि त्याच्या भाचीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २८५, ३०४ (अ), ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.