गणेशोत्सव काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या गणेशोत्व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठीमुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार गेली १० वर्षे शासन नियमांचे आणि कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग ५ वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. मंडप उभारणीसाठी दरवर्षी परवानगी घेण्याच्या कटकटीपासून मंडळांची सुटका होणार आहे. गणपती मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया येत्या ६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
गणेशोत्सवासाठी आता जेमतेम सहा आठवड्यांचा कालावधी राहिला आहे.७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून साधारण एक महिना आधीपासूनच मोठ्या गणेशमूर्तींचे आगमन सुरू होते. त्यामुळे गणेश मंडळांच्या मंडप उभारणीच्या परवानगीसाठी मुंबई पालिकेची यंत्रणाही सज्ज झाली आहे. या वर्षापासून उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून सलग पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार आहे.
सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मागील १० वर्षात सर्व नियम कायदे यांचे पालन केले आहे. त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.मात्र या मंडळांना दरवर्षी या परवानगीचे नूतनीकरण करावे लागणार आहे. यासाठी वाहतूक आणि स्थानिक पोलिस ठाण्याची परवानगी प्राप्त करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर जर मंडळाचा मंडप खासगी जागेवर उभारणार असेल तर परवानगी प्राप्त झालेल्या मंडळांना उत्सवापूर्वी विहित कालावधीत जागामालक अथवा संबंधित सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच वाहतूक पोलीस व स्थानिक पोलिसांच्या परवानगीचे पत्र मिळवणे आवश्यक आहे.
यंदा नव्यानेच सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी देण्यात येणारी मंडप उभारण्याची परवानगी ही या वर्षासाठीच मर्यादित असेल.महानगरपालिका प्रशासनाने यंदा गणेशोत्सव काळात विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून सलग पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येईल.
एक खिडकी योजनेनुसार ६ ऑगस्टपासून संगणकीय प्रणालीद्वारे सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे.एक खिडकी योजनेद्वारे प्राप्त अर्जांची विभागीय कार्यालयाकडून छाननी करण्यात येईल त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस विभागाचे'ना हरकत प्रमाणपत्र'ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून संबंधित नियमांनुसार मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या