अनंत चतुर्थीदिवशी मुंबईत गणपती विसर्जनासाठी (Mumbai Ganesh Visarjan) महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईत २०४ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय बीएमसीने शहरभरात १२,००० हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी १० हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने प्रत्येक घडामोडीवर नजर असेल. त्याचबरोबर २४ हजारहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. त्यामध्ये एसआरपीएफचे १० हजार जवानांचा समावेश आहे.
मुंबईतील गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि इतर चौपाट्यांवर विसर्जनाची तयारी करण्यात आलेली आहे. बंदोबस्तासाठी ९ अप्पर पोलीस आयुक्त, ४० डीसीपी, ५६ एसीपी दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
गणपती उत्सवाच्या दहाव्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीसाठी २४ हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी, दादर, वांद्रे, जुहू, वर्सोवा, पवई तलाव आणि मड आयलंड या महत्त्वाच्या विसर्जन स्थळांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.
अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शहरात नऊ अतिरिक्त पोलिस आयुक्त, ४० पोलिस उपायुक्त आणि ५६ सहाय्यक पोलिस आयुक्तांसह २४ हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता, विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी करत असल्याने वाहनांची सुरळीत वाहतूक आणि पूर्व व पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हिटीसाठी शहर पोलिस 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करणार आहेत. हा कॉरिडॉर अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी असेल, कोस्टल रोड देखील २४ तास खुला राहील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश् न निर्माण होऊ नये, यासाठी शहर पोलिस सतर्क असल्याची माहिती सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
स्थानिक पोलिस बंदोबस्ताबरोबरच एसआरपीएफ प्लाटून, क्विक रिस्पॉन्स टीम, दंगल नियंत्रण पोलिस, डेल्टा, लढाऊ, होमगार्ड आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचीही मदत घेण्यात आली आहे. आठ हजारांहून अधिक सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिस चोख बंदोबस्त ठेवणार असून, गर्दीच्या ठिकाणी महिला व बालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे.
बुधवारी होणाऱ्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी पोलिस बंदोबस्त कायम राहणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी अडीच हजारांहून अधिक वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात राहणार असल्याची माहिती पोलिस सहआयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली.
काही रस्त्यांवर प्रवेश बंदी असेल, तर काही मार्ग डायवर्ट केले जातील. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील किमान १२ जुने पूल धोकादायक असल्याचे जाहीर केले आहेत. गणेश मंडळांनी त्यांचा वापर करताना खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात आणि या ठिकाणी गर्दी होऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शासकीय रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाशीही पोलिस समन्वय साधत असून विसर्जनाच्या दिवशी रात्रभर लोकल धावणार आहेत.