Mumbai Fire News: मुंबईतील गोरेगाव येथून धक्कादायक घटना उघडकीस आली. टेम्पो रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरमध्ये लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर भाजला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. जवळपास अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावच्या मोतीलाल नगरमधील कल्पतरू रेडियंसमध्ये एका टेम्पोच्या रेफ्रिजरेटर कॉम्प्रेसरमध्ये आग लागली. रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गॅस गळतीमुळे टेम्पोला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत दोन जण जखमी झाले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, दुसऱ्या प्रकृती चिंताजनक आहे. सद्दाम हुसैन असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, संजोय मोरया याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेबाबत माहिती देताना अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गोरेगाव परिसरात टेम्पोला आग लागल्याचे समजातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्यातासानंतर आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत सद्दाम हुसैन आणि संजोग मोरया हे दोघे गंभीर जखमी झाले. सद्दाम हुसैनला एचबीटी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. तर, या आगीत संजोग मोरया हा ८० ते ९० टक्के भाजला गेला, त्याच्यावर कूपर रुग्णालयात नेण्यात आला आणि त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या आगीच्या घटनेत टेम्पोच्या शेजारी उभी असलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे.