Mumbai Fire: मुंबईच्या कांदिवली येथील एका खाजगी रुग्णालयाला शनिवारी (२८ एप्रिल २०२४) आग लागल्याची घटना घडली. या आगीत ४ जण होरपळल्याची माहिती समोर येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम येथील आशिष केसर इमारतीतील विन्स रुग्णालयात दुपारी दोन वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. स्वाधीन मुखी (वय, ५६), राजीव (वय, ३५), नरेंद्र मुर्या (वय, ४५), सुनील (वय, ३५) अशी जखमींची नावे आहे. सर्व जखमींना बोरिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अग्निशमन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा तळमजल्यावरील स्टिल्ट भागात असलेल्या रुग्णालयाच्या बाहेर एसी कॉम्प्रेसर दुरुस्तीचे काम सुरू होते. जखमींमध्ये एसी दुरुस्त करणारे खासगी कंपनीचे कामगार आहेत. या घटनेत रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना कोणतीही दुखापत झाली नाही.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वडगावजवळ काल दुपारी एका खाजगी बसला आग लागली. या बसमधून एकूण ३६ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने, कोणत्याही प्रवासाला इजा झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली.ही आग कशामुळे लागली, याबाबत अध्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
यापूर्वी मंगळवारी सकाळी ईस्टर्न फ्रीवेवर एका कारला आग लागल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे निघालेली व्होल्वो एसयूव्ही कार फ्रीवेच्या शिवडी भागात येताच कारने पेट घेतला. वाहन चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कारने पेट घेण्यापूर्वी आपोआप तिचा वेग कमी झाला. काही सेकंदानंतर कारच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. त्यानंतर तो ताबडतोब कारमधून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला.
संबंधित बातम्या