Mumbai Fire News: मुंबईतील लोअर परळ पश्चिमेकडील टाइम्स टॉवर इमारतीला शुक्रवारी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सध्या आग विझवण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
लोअर परळ परिसरातील कमला मिल कंपाऊंडमधील टाइम्स टॉवर इमारतीला सकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने ही आग लेव्हल २ असल्याचे जाहीर केले असून अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या आणि इतर अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असेही त्यांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही आग नेमके कशामुळे लागली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
याआधी २९ डिसेंबर २०१७ रोजी कमला मिल्स कॉम्प्लेक्समधील रेस्टॉरंटमध्ये आग लागली होती. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेस्टॉरंटचे मालक आणि त्यांचे कर्मचारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि गिरणी मालक अशा एकूण १४ जणांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कमला मिल कंपाऊंडचे मालक रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांची मुंबई सत्र न्यायालयाने १० नोव्हेंबर २०२० रोजी निर्दोष मुक्तता केली. या सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा उपाय योजना अधिनियम २००६ मधील संबंधित तरतुदींनुसार सदोष मनुष्यवधासह अन्य गुन्हे दाखल आहेत.