Mumbai Fire News: मुंबईच्या लोअर परळ येथील फिनिक्स मॉलच्या समोरील एलवायएस सलूनला रविवारी (३१ मार्च २०२४) आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीच्या घटनेमुळे यादव चौकातून वाहतूक वळवण्यात आली. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परळ येथील एलवायएस सलूनला आज आग लागल्याची घटना घडली. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. आगीची कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीत भंगाराच्या गोदामाला आज आग लागल्याची घटना उघडकीस आली. या आगीत १५ ते २० गोदाम जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र पाण्याची कमतरता असल्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला वेळ लागला.