Andheri Gas Pipeline Leakage: मुंबईच्या अंधेरी परिसरात आज सकाळी धक्कादायक घटना घडली. गॅस पाइपलाइन लिकेज झाल्यामुळे लागलेल्या आगीत चार जण होरपळले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गॅस गळती थांबवत आग अटोक्यात आणली. या घटनेला एक कंत्राटदार जबाबदार असल्याचे आरोप केला जात आहे, ज्याने काही दिवसांपूर्वी या भागात खोदकाम केले.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी (पश्चिम) येथील एबी नायर रोडवरील पांडुरंग वाडी सोसायटीजवळ सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गॅस लिकेजमुळे आग लागली. या घटनेची माहिती मिळताच महानगर गॅस लिमिटेडच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील गॅस पुरवठा तात्पुरता बंद केला. यानंतर पाइपलाईन दुरुस्त करीत गळती थांबवली. मात्र, या आगीत चार जण होरपळले.
नरसिम्हा फागिला ( वय,५०), वजीर हुसेन (वय, ३०), शांतीलाल चौधरी (वय, २४) आणि आसिफ हुसेन (वय, ३०) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एबी रोडवरील एका कंत्राटदाराने गॅस पाइपलाइन खराब केली, ज्यामुळे आग लागली, असा आरोप केला जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
यापूर्वी गेल्या आठवड्यात मुंबईच्या कांदिवली येथील एका खाजगी रुग्णालयाला आग लागली. या आगीच्या घटनेत चार जण होरपळले. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम येथील आशिष केसर इमारतीतील विन्स रुग्णालयात २७ एप्रिलला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. स्वाधीन मुखी (वय, ५६), राजीव (वय, ३५), नरेंद्र मुर्या (वय, ४५), सुनील (वय, ३५) अशी जखमींची नावे आहे. सर्व जखमींना बोरिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अग्निशमन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा तळमजल्यावरील स्टिल्ट भागात असलेल्या रुग्णालयाच्या बाहेर एसी कॉम्प्रेसर दुरुस्तीचे काम सुरू होते. जखमींमध्ये एसी दुरुस्त करणारे खासगी कंपनीचे कामगार आहेत. या घटनेत रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना कोणतीही दुखापत झाली नाही.
संबंधित बातम्या