Lokhandwala Complex Riya Palace building Fire: मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील रिया पॅलेस इमारतीला बुधवारी (१६ ऑक्टोबर २०२४) सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील १४ मजली इमारतीच्या १०व्या मजल्यावर आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. परंतु, ही आग नेमके कशामुळे लागली? हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला. अंधेरी परिसरातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौथ्या क्रॉस रोडवर असलेल्या रिया पॅलेस इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सकाळी आठच्या सुमारास आग लागली. या आगीत तीन जण जखमी झाले असून त्यांना कूपर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.चंद्रप्रकाश सोनी (वय, ७४), कांता सोनी (वय, ७४) आणि पेलुबेटा (वय, ४२) अशी मृतांची नावे आहेत.
मुंबईतील चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली इमारतीला लागलेल्या आगीत तीन मुलांसह एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या इमारतीच्या तळमजल्याचा वापर दुकान म्हणून आणि वरचा मजला निवासस्थान म्हणून केला जात असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रेसी प्रेम गुप्ता (वय, ७), मंजू प्रेम गुप्ता (वय, ३०), अनिता धर्मदेव गुप्ता (वय, ३९), प्रेम छेदीराम गुप्ता (वय, ३०), नरेंद्र गुप्ता (वय, १०), विधी छेदिराम गुप्ता (वय, १५) आणि गीता देवी धर्मदेव गुप्ता (वय, ६०) अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.
संबंधित बातम्या