Mumbai News: मुंबईतील घाटकोपर भागातील एका इमारतीला शनिवारी आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन ९० हून अधिक जणांना सुरक्षित बाहेर काढले. परंतु, या घटनेत १३ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील येथील रमाबाई आंबेडकर नगर येथील एका इमारतीला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. ९० हून अधिक लोकांनान सुखरुप बाहेर काढण्यात आले. परंतु, १३ जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.'
रमाबाई आंबेडकर मगसवर्गीय गृहनिर्माण संस्थेत ही आगीची घटना घडली. हर्ष अनिल भिसे, स्वीटी संदीप कदम, जान्हवी मिलिंद रायगावकर, प्रियंका काळे, जसिम सलीम सय्यद, ज्योती मिलिंद रायगावकर, फिरोझा इक्बाल शेख, लक्ष्मी लक्ष्मण कदम, लक्ष्मण रामभाऊ कदम, मानसी श्रीवास्तव, अक्षरा सचिन दाते, आबिद शाह आणि अमीर इक्बाल अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याआधी एक दिवसापूर्वी मुलुंड परिसरातील ओपल अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावर आग लागली. या आगीची माहिती देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने सांगितले की, या घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मुलुंडमधील एलबीएस रोडवरील भांडुप सोनापूर सिग्नल येथे असलेल्या ओपल अपार्टमेंटमध्ये ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अपार्टमेंटच्या 9व्या मजल्यावर आग लागली, ज्यामध्ये एक एस.एम. आनंदी (वय, ६८) या वृद्ध महिला जखमी झाल्या. त्यांना जवळच्या एम.टी. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.