Ex-MLA Son Suicide: धक्कादायक! बेरोजगारीला कंटाळून माजी आमदाराच्या मुलाची आत्महत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ex-MLA Son Suicide: धक्कादायक! बेरोजगारीला कंटाळून माजी आमदाराच्या मुलाची आत्महत्या

Ex-MLA Son Suicide: धक्कादायक! बेरोजगारीला कंटाळून माजी आमदाराच्या मुलाची आत्महत्या

Oct 16, 2024 09:59 AM IST

Mumbai Ex-MLA Son Suicide News: मुंबईतील कांदिवली परिसरात माजी आमदाराच्या मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

बेरोजगारीला कंटाळून माजी आमदाराच्या मुलाची आत्महत्या
बेरोजगारीला कंटाळून माजी आमदाराच्या मुलाची आत्महत्या

Mumbai News: माजी आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेते राम पंडागळे यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मुंबईतील कंदिवली पूर्व येथील लोखंडवाला परिसरातील एका आलिशान अपार्टमेंटमधील राहत्या घरी त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. मृताजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडली नसून बेरोजगारीला कंटाळून त्याने आपली जीवनयात्रा संपवली, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जयेश पंडागळे (वय, ३९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जयेश रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास झोपायला जातोय, असे सांगत त्याच्या बेडरूममध्ये गेला. मात्र, तो अनेक तास बाहेर न आल्याने त्याच्या आईने त्याला हाक मारली, पण त्याच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जयेशच्या कुटुंबातील लोकांनी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्याच्या बेडरूमचा दरवाजा तोडला असता तो छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

समता नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताजवळ कोणतीही सुसाइड नोट न सापडल्याने आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. परंतु, मयत गेल्या दोन वर्षांपासून बेरोजगारीचा सामना करत होता. त्यामुळे तो तणावात होता. यामुळेच त्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. मात्र, या घटनेने पंडागळे कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले.

छत्रपती संभाजीनगर: पोलीस उपायुक्तांच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरात पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (१२ ऑक्टोबर २०२४) घडली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या खोलीतील आरशात मी जीवनाचा आनंद घेतला आहे, असे लिहिल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहिल शीलवंत नांदेडकर (वय. १७) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून तो इयत्ता बारावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.

भारतात आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा

भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा मानसिक तणावातून लोक आत्महत्येचा निर्णय घेतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असेल तर, सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल, याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणती चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील मोठ्या आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.

 

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर