धारावीमधील पात्र रहिवाशांना ३५० चौरस फूट आकाराचा फ्लॅट मिळणार असल्याची घोषणा अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (Dharavi Redevelopment Project) आज केली. १ जानेवारी २००० च्या आधी अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टीवासीयांनाच धारावीत घरे मिळणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. तब्बल ४५० एकर परिसरात पसरलेल्या या झोपडपट्टीच्या विकासाचे काम अदानी उद्योग समूहाला देण्यात आले आहे. अदानी उद्योग समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यादरम्यान 'धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) ही संयुक्त उपक्रम म्हणून कंपनी स्थापन करण्यात आली आहे. धारावीकरांचे जीवनमान उंचावून, उत्तम आर्थिक संधी उपलब्ध करून देत धारावीचा व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर म्हणून विकास करण्याचा उद्देश कंपनीने या आधीच जाहीर केला आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या धारावीमध्ये नागरिकांसाठी उत्तम व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैली उपलब्ध करण्यात येणार आहे. सोबतच येथे सांस्कृतिक केंद्र, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक उद्याने, दवाखाने आणि मुलांसाठी संगोपन केंद्र उभारण्याची कंपनीची योजना आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेसाठी अदानी उद्योगसमूहाने ५०७० कोटी रुपयांची बोली लावली होती. त्याखालोखाल डीएलएफने २०२५ कोटी रुपयांची बोली लावली होती. दरम्यान, धारावी झोपडपट्टीत तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांनाच घरे देण्यात येणार आहे. पोटमजला तसेच वरील मजल्यांवरील रहिवाशांना घरे मिळणार नाहीत. अशा अपात्र ठरणाऱ्या निवासी सदनिका धारकांना महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार प्रस्तावित, परवडणाऱ्या भाड्याच्या गृहनिर्माण धोरणांतर्गत निवासस्थान देण्यात येईल, असं अदानी कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. ही भाड्याची निवासस्थाने मूळ प्रकल्पापासून १० किमी लांब अंतरावर असणार आहे.
धारावीत १३ हजारहून अधिक चामडे, मातीच्या वस्तू, टेक्स्टाईल, गारमेंट आणि शिलाईचं काम असे अनेक छोटे-मोठ्या प्रकारचे लघुउद्योग येथे आहेत. धारावी झोपडपट्टी ही मुंबई उपनगर रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम लाईनला जोडलेली आहे. धारावीच्या पश्चिमेकडे माहीम रेल्वे स्टेशन, पूर्वेकडे सायन परिसर आणि उत्तेरेच्या दिशेला मिठी नदी आहे. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास होत असताना येथील झोपड्यांचे पात्र व अपात्रतेचे निकष मात्र १ जानेवारी २००० सालापर्यंतचेच आहेत. त्यामुळे धारावीतील झोपडपट्ट्यांचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी धारावीकर नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या