Mumbai News: मुंबईतील दहिसर येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या बैठकीमध्ये झालेल्या वादातून अध्यक्षाने दाताने सदस्याच्या हाताचा अंगठा तोडल्याची घटना घडली. या घटनेनंतर सदस्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे. दहिसर येथील पश्चिम म्हात्रेवाडीत आज (रविवारी, ०४ ऑगस्ट २०२४) सकाळी ही घटना घडली.
मुंबईतील दहिसर येथील पश्चिम म्हात्रेवाडी येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये आज सकाळी सोसायटी अध्यक्षांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होत. या बैठकीत अध्यक्ष नित्यानंद परिहार आणि सदस्य आदित्य देसाई वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत नित्यानंद परिहार यांनी चक्क दाताने आदित्य देसाई यांचा अंगठा तोडला. आदित्य देसाई यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांच्या हाताला ड्रेसिंग केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मुंबईत हत्या आणि आत्महत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती देण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तीही घरात मृतावस्थेत आढळून आली. महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली, जेव्हा ५८ वर्षीय किशोर पेडणेकर यांचा मृतदेह जवाहरनगरमधील टोपीवाला मॅन्शनसमोर रस्त्यावर आढळून आला. किशोर पेडणेकर हा व्यवसाय करायचा. त्यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
किशोरचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी किशोरची पत्नी राजश्री हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तिने फोन उचलला नाही. यानंतर पोलीस आतून कुलूप असलेल्या त्याच्या फ्लॅटवर पोहोचले. पोलिसांना किशोरच्या गळ्यात दोन चाव्या लटकलेल्या आढळल्या, त्यानंतर पोलिसांनी फ्लॅट उघडल्यानंतर आत गेल्यावर ते चक्रावून गेले. हॉलमध्ये राजश्री (वय, ५७) हिचा मृतदेह आढळून आला. तिची गळा आवळून खून करण्यात आला. आत्महत्येपूर्वी किशोरने पत्नीची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.