Mumbai Dabbawala news : मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला! हक्काचं घर मिळणार, राज्य सरकारकडून मोठी घोषणा-mumbai dabewala get 5000 sq ft affordable houses in mumbai just rupees 25 lakh maharashtra government announcement ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Dabbawala news : मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला! हक्काचं घर मिळणार, राज्य सरकारकडून मोठी घोषणा

Mumbai Dabbawala news : मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला! हक्काचं घर मिळणार, राज्य सरकारकडून मोठी घोषणा

Sep 13, 2024 03:49 PM IST

Mumbaidabbawala affordable houses : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत म्हाडाकडून मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार आहेत. डबेवाल्यांसोबतच चर्मकार समाजालाही सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला
मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्णयांचा धडका लावला आहे. यामध्ये आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. राज्य सरकारने मुंबईतील डबेवाल्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाकडून हक्काचं घर देण्याची घोषणा केली आहे.पंतप्रधान आवास योजनेतंर्गत म्हाडाकडून मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार आहेत. डबेवाल्यांसोबतच चर्मकार समाजालाही सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतंर्गत मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला अवघ्या २५ लाख रुपयांमध्ये मुंबईत ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आमदार श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असो. चे अशोक गायकवाड महाराज आदि उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत डबेवाल्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळावीत यासाठी पाठपुरावा केला जात होता. त्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सभागृहात दिलेल्या आश्वासनानंतर आता पीएम आवास योजनेतून डबेवाल्यांना घरं दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी मुंबईत १२ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. याच्या माध्यमातून डबेबाल्यांना लवकरच मुंबईत हक्काची घरं मिळणार आहेत. मुंबई डबेवाल्यांच्या संघटनेने शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेट घेतली. यावेळी डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंज्यस करार करण्यात आला.

मुंबईच्या डबेवाल्यांसोबतच चर्मकार समाजातील लाभार्थ्यांनाही या योजनेत घरं दिली जाणार आहेत. या योजनेसाठी प्रियांका होम्स रियालिटी ३० एकर जागा देणार आहे. तर नमन बिल्डर ना नफा ना तोटा तत्वावर या घरांचं बांधकाम करणार आहे. ५०० चौरस फुटांच्या १२ हजार घरे बांधली जाणार आहेत. येत्या ३ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून डबेवाले आणि चर्मकार समाजाचे आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांचा १३० वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लोकलची गर्दी, मुंबईचं ट्रॅफिक अशा साऱ्याच समस्यांतून रेल्वे आणि सायकलने ग्राहकांपर्यंत डबे पोहोचवण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचे जगभर कौतुक झाले आहे. ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनीही डबेवाल्यांचं कौतुक केले आहे. त्याचबरोबर आयआयएममध्येही त्यांच्या व्यवस्थापनाचे धडे दिले जातात.

Whats_app_banner