ब्रिटनचा राजा किंग चार्ल्स यांना कॅन्सर झाल्याचं वृत्त समजताच जगभरात शोककळा पसरली आहे. ब्रिटिश राजघराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले मुंबईतले डबेवालेही किंग चार्ल्सच्या तब्येतीमुळे अस्वस्थ आणि दु:खी झाले आहेत. किंग चार्ल्सच्या आजारपणाची बातमी ऐकल्यानंतर मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनाही धक्का बसला. ते सांगतात, ‘ब्रिटनचा राजा चार्ल्स यांना कॅन्सरचे निदान झाल्याची बातमी आम्ही बकिंगहॅम पॅलेसमधून ऐकली. ही बातमी ऐकून मुंबईतील सर्व डबेवाल्यांना फार दु:ख झालं. किंग चार्ल्सशी मुंबईतील डबेवाल्यांची अतिशय सुंदर आणि घट्ट मैत्री आहे. आमचे नाते द्वारकेचा कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीसारखी आहे.’ असं तळेकर सांगतात.
ब्रिटनचं राजेपद मिळण्यापूर्वी चार्ल्स हे वेल्सचे युवराज होते. त्यावेळी चार्ल्स यांनी बीबीसीच्या एका लघुपटातून मुंबईच्या डबेवाल्यांच्या अचूक व्यवस्थापनाबद्दल माहिती मिळाली होती. डबेवाल्यांचं हे कौशल्य पाहून चार्ल्स अवाक झाले होते आणि पुढच्या भारत भेटीदरम्यान डबेवाल्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर २००३ साली भारत भेटीवर आले असताना मुंबईत येऊन प्रिंस चार्ल्स यांनी चर्चगेट येथे २० मिनिटे भेट घेतली होती. किंग चार्ल्सने दुसरं लग्न केलं तेव्हा मुंबईच्या डबेवाल्यांना बकिंगहॅम पॅलेसमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. ही घटना आम्ही कधीच विसरू शकणार नाही, असं तळेकर यांनी सांगितलं. किंग चार्ल्स यांचा मुलगा युवराज हॅरीचं लग्न झालं तेव्हा डबेवाल्यांनी येथून लग्नाची भेट पाठवली होती. किंग चार्ल्स आजोबा झाले तेव्हा सुद्धा डबेवाल्यांनी बाळासाठी घुंघरवाले भेट म्हणून पाठवली होत, याची आठवण तळेकर यांनी करून दिली. मुंबईचे डबेवाले गेल्या १३५ वर्षांपासून शहरात काम करत आहेत. या शहरात आम्हाला ओळखणारे बरेच होते. परंतु किंग चार्ल्स मुंबईत येऊन आम्हाला भेटले आणि परिसस्पर्श व्हावा त्याप्रमाणे आमच्या जीवनाला स्पर्श झाला आणि डबेवाल्यांची जगभरात ओळख निर्माण झाली असल्याचं तळेकर म्हणाले.
किंग चार्ल्स हे आम्हाला वडिलांसारखे आहेत. कारण ते आम्हाला मुंबईत येऊन भेटल्यावरच लोक आम्हाला 'मॅनेजमेंट गुरु' वगैरे म्हणू लागले. अशावेळी त्यांना जाऊन भेटण्याची आमची इच्छा आहे. पण ते अवघड आहे. त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, असं तळेकर म्हणाले.
संबंधित बातम्या