Mumbai crime news : स्वप्ना नगरी म्हटल्या जाणार्या मुंबईत अनेक जण विविध स्वप्न घेऊन येत असतात. मुंबईतील धकाधकीच्या आणि गर्दीने भरलेल्या जीवनात अनेक जण तणावाखाली काम करत असतात. हा ताण तणाव मुंबईचा दैनंदिन भाग असला तरी, याच तणावातून अनेक जण टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. मुंबईत रोज चार नागरीक आपले जीवन संपवत असल्याची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. संपूर्ण देशातील शहरांमध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईत २०२२ मध्ये १५०१ आत्महत्येच्या घटनांची नोंद झाली होती, तर २०२१ मध्ये १४३६ घटनांची नोंद झाली होती. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये यात ४.५ टक्याने वाढ झाली असून, ही चिंतेची बाब आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार दिल्लीत सर्वाधिक ३,३६७ आत्महत्या झाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बेंगळुरू असून येथे २०२२ मध्ये २३१३ आणि चेन्नईमध्ये १५१८ आत्महत्यांच्या घटनांची नोंद झाली. या तीन शहरांनंतर मुंबई चौथ्या स्थानावर आहे, जिथे १५०१ लोकांनी आपले जीवन संपवले. गेल्या वर्षी देशभरात महाराष्ट्रात २२७४६ जणांनी आत्महत्या केल्या. यानंतर तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर असून तमिळनाडूनत १९८३४ नागरिकांनी आत्महत्या केल्या. मध्य प्रदेश तिसऱ्या स्थानावर असून येथे १५३८६ नागरिकांनी जीवन संपवले, कर्नाटक चौथ्या स्थानावर असून येथे १३६०६ आत्महत्या झाल्या. तर पश्चिम बंगाल पाचव्या स्थानावर असून १२ हजार ६६९ जणांनी आत्महत्या झाल्या. देशभरातील एकूण आत्महत्यांपैकी ४९ टक्के नागरीक या पाच राज्यांमध्ये राहत होते, यावरून महानगरांची जीवनशैली किती धकाधकीची झाली आहे हे देखील वास्तव पुढे आले आहे.
आत्महत्या करण्याच्या प्रकारात मुंबईचा देशात चौथ्या क्रमांक लागतो. मुंबईत सर्वाधिक आत्महत्या या कौटुंबिक कारणातून झाल्या आहेत. एनसीआरबीच्या अहवालात कौटुंबिक कलहामुळे ३७४ जणांनी जीव दिला आहे. तर आजारपणाला कंटाळून २३९ लोकांनी आत्महत्या केला. अंमली पदार्थांचे व्यसनामुळे १७२, बेरोजगारीमुळे १०० जणांनी, परीक्षेत अपयश आल्याने ७२ मुलांनी, प्रेमप्रकरणात अपयश आल्याने ५० जणांनी, कर्ज प्रकरणातून २८ जणांनी, गरिबीमुळे २३ तर वैवाहिक जीवनातील निराशेमुळे २५ नागरिकांनी, प्रियकर गमावल्यामुळे १२ महिलांनी, मालमत्तेच्या वादातून ८ जणांनी . तर व्यवसायात अपयश आल्याने १२ जणांनी आत्महत्या केल्या होत्या. ८३ जणांनी आत्महत्या का केली, तर २८२ जणांनी इतर कारणांमुळे आत्महत्या का केल्या, हे पोलिस तपासात निष्पन्न होऊ शकले नाही.
या बाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ.सागर मुंद्रा म्हणाले, व्यस्त जीवन, एकटेपणा, मानसिक आजार, प्रियजनांच्या वाढत्या उपेक्षा, नकारात्मक विचार, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, नैराश्य आणि संवादातील अंतर आदींमुळे आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. जेव्हा लोकांना काही समस्या येतात, तेव्हा त्यांना सामोरे जाण्याऐवजी त्यांना आत्महत्या करणे सोपे जाते, ही खरोखरच चिंतेची बाब आहे. यावर मात करण्यासाठी समुपदेशन आवश्यक आहे.
संबंधित बातम्या