Mumbai Crime News : राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांचे नाव घेत एका महिलेची तब्बल ५४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना वर्सोवा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मेघना सातपुते, नितेश पवार, सावंत काका आणि राकेश गावडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनी या महिलेच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देतो असे सांगून तिच्या कडून ५४ लाख रुपये घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने वर्सोवा पोलिस ठाण्यात जात तक्रार दाखल केली आहे.
पीडित महिला ही अंधेरी येथे राहते. ती एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करते. महिलेच्या २३ वर्षीय मुलीने ऑक्टोबर २०२० मध्ये नीट परीक्षेत ३१५ गुण मिळवले. सध्या पीडित महिलेची ही मुलगी बंगळुरूमध्ये बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. दरम्यान, २०२१ च्या मार्च महिन्यात ही महिला तिच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत होती. या दरम्यान, या महिलेची तिची जुनी मैत्रीण मेघना सातपूतेशी भेट झाली. यावेळी या महिलेची पीडित महिलेची भेट ही आरोपी नितेश पवार आणि राकेश गावडे यांच्याशी घालून दिली. हे दोघे सिंधुदुर्गात येथील एका वैद्यकीय विद्यालयाचे विश्वस्त असल्याची त्यांनी बतावणी केली. पीडित महिलेच्या मुलीला त्यांनी या विद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवले. व्यवस्थापन कोट्यातून मुलीला प्रवेश देणार असून यासाठी त्यांनी महिलेला १५ लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम देऊन देखील महिलेच्या मुलीला प्रवेश देण्यात आला नाही. दरम्यान, कोरोना असल्याचे कारण देत नियम बदलल्याचे आरोपींनी महिलेला सांगितले. त्यामुळे त्यांनी आणखी ५ लाख रुपयांची मागणी महिलेकडे केली. असे करून या महिलेले आरोपींना तब्बल ४५ लाख रुपये दिले.
तरी तिच्या मुलीला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा संशय महिलेला आला. या महिलेने वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन चौकशी केली. मात्र, तिला प्रवेश मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. तिने आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मोबाइल बंद केले होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेला समजले. यामुळे महिलेने पोलिसांत जात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
संबंधित बातम्या