kurla murder news : मुंबईत गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. कुर्ला येथे एका व्यक्तिनं किरकोळ कारणावरून आपल्या सहकाऱ्याची हत्या केल्याचं उघडं झालं आहे. ऑटोरिक्षाचं भाडं देण्यावरुन वाद झाला आणि याच वादातून ही हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. ही घटना सोमवारी कुर्ला येथे घडली. आरोपीला पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावरून पळून जात असतांना अटक केली आहे.
सैफ जाहिद अली असे आरोपीचे नाव आहे. तर छक्कन अली असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ जाहिद अली व छक्कन अली हे दोघे एकाच कापडाच्या कंपनीत काम करतात. सोमवारी दुपारी हे दोघे आर्टिरियल एलबीएस मार्गावरून जात असतांना त्यांच्यात रिक्षा भाड्यावरून वाद झाला. यातून ही हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व हत्या झालेली व्यक्ति हे दोघेही एकाच कंपनीत काम करतात. कंपनीतून काम आटोपून ते घरी जात होते. यावेळी रिक्षातून जाण्यावरून व त्याचे पैसे कोण देणार यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद टोकाला गेला. याच वेळी संतापलेल्या आरोपीने चाकूने छक्कन अलीवर वार केले. यात छक्कन अली हा गंभीर जखमी झाला. त्याला काही नागरिकांनी दवाखान्यात नीले मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर आरोपी फरार झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले.
यात आरोपी हा छक्कन अलीवर वार करत असल्याचं निष्पन्न झालं. तसेच दोघेही एकाच कंपनीत काम करत असल्याचं देखील पुढं आलं. आरोपी हा फरार झाला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने तपास हाती घेतला. यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला कल्याण स्थानकात अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, ऑटोरिक्षाचं भाडं देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून त्याने छक्कन अलीवर हल्ला करत त्याची हत्या केली असल्याचं कबूल केलं. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला कुर्ला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.