एएनआय वृत्त संस्थेने भांडुप पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल बनविण्याचे आमिष दाखवून एका तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्याककडून ४५ लाख रुपये उकळल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल चव्हाण, श्रेयश पाटील आणि हार्दिक अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सध्या शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीची पदवी घेत आहे. तिने भांडुप पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, हार्दिक नावाच्या एका व्यक्तीने तिच्याशी इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधला आणि मॉडेलिंगमध्ये करिअर बनविण्यात तिची मदत करू शकतो, असे म्हणाला. हार्दिकने तरुणीला तो धर्मा प्रॉडक्शन, नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्ससोबत काम करत असल्याचे पटवून दिले. याशिवाय, मॉडेलिंगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करशील, असेही सांगितले. तरुणीने हार्दिकच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
पुढे हार्दिकने पाडितेला राहुल चव्हाण नावाच्या दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितले. हार्दिकने वांद्रे येथील हुक्का बारमध्ये तिघांची एक बैठक आयोजित केली. त्यावेळी राहुलने पीडितेकडे नोंदणी शुल्क म्हणून २० हजारांची मागणी केली. यानंतर तिने पालकांकडून उसने पैसे घेऊन राहुलला २० हजार दिले. राहुलने तिला आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई व्हिटॉनसोबत शूटिंग करण्याचे आमिष दाखवत आणखी एक लाख रुपयांची मागणी केली.परंतु, तिच्या आई-वडिलांनी एवढी मोठी रक्कम देण्यास नकार दिला. यानंतर राहुलने तिला घरातून सोन्याचे दागिने चोरण्याचा सल्ला दिला आणि तिनेही घरातील दागिन्यांची चोरी केली. यानंतर राहुलने अनेकदा पीडिताकडून पैसे उकळले. यादरम्यान, राहुलने अनेकदा पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
यानंतर हार्दिकने पीडितेला इंस्टाग्रामवर मेसेज केला आणि मॉडेलिंगसाठी नग्न छायाचित्रे पाठवण्याची मागणी केली. त्यावेळी हार्दिकने पीडिताचा चेहरा लपवला जाईल, असे तिला सांगितले. हार्दिकच्या म्हणण्यानुसार, पीडिताने त्याला स्वत:चे नग्न फोटो पाठवले. मात्र, फोटो पाठवल्यानंतर हार्दिकने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर श्रेयस नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने इन्स्टाग्रामद्वारे पीडितेशी संपर्क साधला आणि स्वतःची ओळख राहुलची भागीदार म्हणून सांगितली. तसेच तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. एप्रिल महिन्यापासून सुरु झालेला हा प्रकार थांबवण्यासाठी पीडितेने भांडुप पोलीस ठाणे गाठून तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.