मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राणा दाम्पत्य पुन्हा गोत्यात; जामिनाच्या अटींचा भंग केल्याप्रकरणी कोर्टाची नोटीस

राणा दाम्पत्य पुन्हा गोत्यात; जामिनाच्या अटींचा भंग केल्याप्रकरणी कोर्टाची नोटीस

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 09, 2022 03:29 PM IST

जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयानं घातलेल्या अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

रवी राणा-नवनीत राणा
रवी राणा-नवनीत राणा

राजद्रोहाच्या आरोपाखाली १२ दिवस कोठडीत राहिल्यानंतर जामिनावर सुटलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जामिनाच्या अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) त्यांना नोटीस बजावली आहे. तुम्हा दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये, असा सवाल न्यायालयानं राणा दाम्पत्याला केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घरासमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्याची घोषणा करत मुंबई पोलीस व राज्य सरकारला आव्हान दिल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयानं काही अटीशर्तींवर त्यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाशी संंबंधित कुठल्याही गोष्टीवर मीडियाशी बोलू नये. तसंच, जामिनावर असताना कुठलाही गुन्हा करू नये, अशा अटी न्यायालयानं घातल्या होत्या. मात्र, मागील दोन दिवसांपासून नवनीत राणा व रवी राणा सातत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांना आव्हान देत आहेत.

मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेत सत्र न्यायालयात धाव घेतली होती. राणा दाम्पत्यानं मीडियाशी बोलून न्यायालयानं घातलेल्या अटींचं उल्लंघन केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप राणा दाम्पत्य करत आहे. मुख्यमंत्री व शिवसेनेला खुलेआम आव्हान देत आहेत. हे योग्य आहे का? राणा दाम्पत्याला पोलीस किंवा तुरुंग प्रशासनाविषयी काही तक्रार असेल तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी. त्यासाठी प्रसारमाध्यमांशी बोलण्याची गरज नाही, असं म्हणणं पोलिसांनी मांडलं आहे. 'राणा दाम्पत्याचा जामीन तात्काळ रद्द करावा व त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं जावं, अशी विनंती पोलिसांनी याचिकेद्वारे केली आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे.

नवनीत राणा यांनी आरोप फेटाळले!

‘जामिनाच्या अटीशर्तींचं कुठलंही उल्लंघन आम्ही केलेलं नाही. तुरुंगात मिळालेल्या वागणुकीबद्दल आम्ही बोलत आहोत. आमच्यावर जे आरोप आहेत, त्याबद्दल आम्ही चकार शब्दही काढलेला नाही. देवाचं नाव घेतलं म्हणून आम्हाला तुरुंगात टाकत असतील तर पूर्ण आयुष्य तुरुंगात काढायला तयार आहोत,’ असं नवनीत राणा नोटिशीच्या प्रश्नावर बोलताना म्हणाल्या.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग