मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai footpath: चर्नीरोड स्टेशन समोरचा फुटपाथ चकाचक; ३२ अतिक्रमण हटवले

Mumbai footpath: चर्नीरोड स्टेशन समोरचा फुटपाथ चकाचक; ३२ अतिक्रमण हटवले

HT Marathi Desk HT Marathi
Sep 26, 2022 08:14 PM IST

मुंबईत गजबजलेल्या चर्नी रोड परिसरातील फुटपाथवर उभारण्यात आलेल्या ३२ अनधिकृत झोपड्या मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने तोडल्या.

BMC removed encroachment at Charni road station footpath
BMC removed encroachment at Charni road station footpath

मुंबईत अतिशय गजबजलेला परिसर असलेल्या चर्नी रोड स्टेशन (पूर्व) नजिक असणाऱ्या महर्षी कर्वे मार्ग तसेच सैफी रुग्णालया जवळ फुटपाथवर उभारण्यात आलेल्या ३२ झोपड्या आज मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पाडल्या. या झोपड्यांमुळे फुटपाथवर चालताना पादचाऱ्यांना अनेकदा अडथळा येत होता. परिणामी अपघाताची शक्यता वाढली होती. याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागाद्वारे आज करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान या ३२ झोपड्या हटविण्यात आल्या. या कारवाईत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ८० कामगार, कर्मचारी, अधिकारी सामिल झाले होते. मुंबई वाहतूक पोलिसांचीही मदत घेण्यात आली. या कारवाईसाठी मोठ्या आकारातील पाईप उचलण्यासाठी वापरण्यात येणारे हायड्रा मशिन वापरून सदर फुटपाथ मोकळा करण्यात आला आहे. यामुळे पादचाऱ्यांना या फुटपाथचा उपयोग करणे अधिक सुलभ होणार असल्याची माहिती ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

झोपड्या हटविल्यानंतर सदर ठिकाणी कीटक नियंत्रण खात्याद्वारे फवारणी करण्यात आली. तसेच कचरा डंपरद्वारे तत्काळ मलबा हटविण्यात आला. त्याचबरोबर सदर ठिकाणी घन कचरा व्यवस्थापन खात्याद्वारे साफसफाई करण्याचे काम प्रगतीपथावर असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर फुटपाथ बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. अशी माहिती उघडे यांनी दिली.

IPL_Entry_Point