मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BS Koshyari: कोश्यारींना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरे भडकले!

BS Koshyari: कोश्यारींना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरे भडकले!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 30, 2022 01:53 PM IST

Uddhav Thackeray on Bhagat Singh Koshyari: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Bhagat Singh Koshyari - Uddhav Thackeray
Bhagat Singh Koshyari - Uddhav Thackeray

Uddhav Thackeray on Bhagat Singh Koshyari: मुंबई व महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ‘गेल्या अडीच वर्षांत या राज्यपालांनी महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी पाहिल्या नसतील, पण कोल्हापूरचा जोडा त्यांनी पाहिला नसेल. हा जोडा त्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे,’ अशी जळजळीत टीका उद्धध ठाकरे यांनी केली आहे.

मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात काल एक वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रातून खासकरून मुंबई व ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर इथं पैसाच उरणार नाही. हे शहर आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जाणार नाही, असं ते म्हणाले होते. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. कोश्यारी यांच्या याच वक्तव्याचा उद्धव यांनी समाचार घेतला. कोश्यारी यांच्या आतापर्यंतच्या वर्तणुकीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 

'राज्यपाल पदाचा मी अवमान करू इच्छित नाही. मात्र, त्या खुर्चीचा मान खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीनं राखला पाहिजे. कोश्यारींनी तो ठेवलेला नाही. गेल्या तीन चार वर्षातली त्यांची वक्तव्ये पाहिली तर महाराष्ट्राच्याच नशीबी असे लोक का येतात हा प्रश्न आहे, असा संताप उद्धव यांनी व्यक्त केला. 

'मागे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल याच कोश्यारींनी अत्यंत हिणकस वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रात सगळा काही मानमरातब गेल्या काही वर्षांत मिळवला आणि मराठी माणसाचाच अपमान केला. गेल्या अडीच-तीन वर्षांत महाराष्ट्र त्यांनी बऱ्याच चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील. गडकिल्ले, मंदिरं, पैठणी पाहिली असेल, पण कोल्हापूरचा जोडा त्यांनी पाहिला नसेल. हा जोडा त्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रातली साधी माणसं कष्टातून कशी वर येतात ते हा जोडा पाहून त्यांना कळेल. त्यासाठी त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवले पाहिजेत. बाकी यातून कोणाला काय अर्थ काढायचे ते काढा, असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

ही नमकहरामीच आहे!

'राज्यपालांचं वक्तव्य अनावधानानं आलेलं नाही. त्यांची भाषणं मुंबईत लिहिली जातात की दिल्लीतून येतात हा प्रश्न आहे. कारण, अनेक मुद्द्यावर ते अजगरासारखे सुस्त पडून राहतात आणि काही मुद्द्यावर अनावश्यक तत्परता दाखवतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. कोश्यारींनी हिंदू समाजातही फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या मिठाशी त्यांनी नमकहरामी केली आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

IPL_Entry_Point