मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Milind Deora : मुंबई काँग्रेसकडून मिलिंद देवरा यांच्यासह २३ सदस्यांचं निलंबन

Milind Deora : मुंबई काँग्रेसकडून मिलिंद देवरा यांच्यासह २३ सदस्यांचं निलंबन

Jan 15, 2024 05:59 PM IST

Mumbai Congress Suspends 23 members : मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मुंबई काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यासह २३ सदस्यांना निलंबित केलं आहे.

Milind Deora joined Shinde faction
Milind Deora joined Shinde faction

काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षत्याग केल्यानंतर मुंबई काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी रविवारी संध्याकाळीच देवरा यांच्यासह शिंदे गटात जाणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे आदेश काढले. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह प्रा. वर्षा गायकवाड यांनी वैयक्तिक संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. 

मिलिंद देवरा यांच्यासोबत दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेविका सुशीबेन शहा, सुनील नरसाळे, रामबच्चन मुरारी, हंसा मारू, अनिता यादव हे माजी नगरसेवक,  दक्षिण मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश राऊत आणि अॅड. त्र्यंबक तिवारी यांच्यासह २३ पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या २३ जणांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी रविवारी रात्रीच त्यांचं निलंबन केलं.

मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात गर्दी -

दक्षिण मुंबईतील एका नेत्याने पक्षत्याग केल्यामुळे काँग्रेस खचेल, ही विरोधकांची समजूत चुकीची असल्याचं सोमवारी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने सिद्ध केलं. सोमवारी सकाळी असलेल्या दक्षिण मुंबईतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठकीसाठी ३५० पेक्षा जास्त जण एकत्र आले होते. यात आमदार अमीन पटेल, ज्येष्ठ नेते भवरसिंह राजपुरोहित,  पालिकेतील माजी विरोधी पक्षेनेते ज्ञानराज निकम, किशन जाधव, अश्फाक सिद्दीकी, पूरन दोशी आदी नेत्यांचा समावेश होता. आम्ही कायम काँग्रेससोबतच आहोत आणि कायम राहू. जे गेले त्यांच्यामुळे पक्षाची ताकद अजिबात कमी होणार नाही. आम्ही जोमाने पक्षवाढीसाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करू, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 

ट्रेंडिंग न्यूज

‘ते लोक होते वेगळे...’

पक्ष आणि विचारधारा यांच्याशी प्रामाणिक राहून काम करणारे लोक यशस्वी होतात. दुर्दैवाने मिलिंदजींनी पक्षाशी आणि विचारधारेशीही फारकत घेतली. पण एक व्यक्ती सोडून गेल्याने ना पक्ष खिळखिळा होत ना विचारधारा कमकुवत होत! उलट त्यामुळे मला आणि असंख्य कार्यकर्त्यांना काम करायला बळ मिळालं आहे. सुरेश भटांचा एक शेर या वेळी मला आठवतोय, ‘ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे.. मी वाट थांबून पाहतो, मागे किती जण राहिले?’ हे मागे राहिलेले लोक सच्चे काँग्रेसी आहेत आणि तेच आम्हाला विजयपथावर घेऊन जातील,अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर