मुंबईत नवनिर्मित कोस्टल रोड बोगद्यात (Mumbai coastal road tunnel) गुरुवार दुपारच्या सुमारास पहिल्या अपघाताची नोंद करण्यात आली. येथे भरधाव वेगातील कार बोगद्यातील भिंतीवर आदळली. (Mumbai coastal road accident)
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी जवळपास २.३० वाजण्याच्या सुमारास मरीन ड्राईव्ह एक्झिट जवळ दक्षिणेकडे जाणाऱ्या बोगद्यात झाला. एक कार भिंतीला धडकून रस्त्यातच आडवी झाली. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कारने तिला धडक दिली. या अपघातात कोणाला दुखापत झाली नाही, मात्र या अपघातामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली.
वाहतूक पोलीस आणि बृहन्मुंबई महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व अपघातग्रस्त वाहने बाजुला करण्यात आली. गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्य मुंबईतील वरळीला दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्सला जोडणाऱ्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ मार्च रोजी झाले होते.
उद्घाटनानंतर एक महिन्याच्या आत कोस्टल रोडवर पहिल्या अपघाताची नोंद झाली आहे. अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दिसते की, मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यात एक काळ्या रंगाची कार रस्त्याकडेच्या भिंतीवर आदळते. अपघातानंतर कोस्टल रोड बोगद्यामध्ये मोठी वाहूतक कोंडी झाल्याचे दिसते.
भिंतीला धडकलेल्या कारला पाठीमागून येणारी दुसरी कार धडक देते. दोन कारच्या धडकेत दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचे नोठे नुकसान झाले आहे.
तीन आठवड्यांपूर्वी कोस्टल रोडचे उद्घाटन करण्यात आले आहे. कोस्टल रोडकडे मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणून पाहिलं जातं.
अपघातानंतर एका व्यक्तीने कॉल करून CP-5 जवळ बोगद्यामध्ये कारचा अपघात झाल्याचे लोकल ऑपरेशन मेंटेनन्स रूमला कळवले. लोकल ऑपरेशन रुमने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज पाहून याची माहिती संबंधित विभागाला दिली. त्यानंतर मार्शलसह बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी टोइंग व्हॅनही तत्काळ दाखल झाली. मार्शल्सने बोगद्यातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणली.
कार चालकाने दिलेल्या माहितीनुसार कारचे स्टेअरिंग जाम झाल्याने हा अपघात घडला. कारमधून दोन जण प्रवास करत होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे बोगद्याच्या आत ऑईल गळती झाली होती. अपघात टाळण्यासाठी रस्ता साफ करण्यात आला. ११ मार्च रोजी लोकार्पण झालेला कोस्टल रोड मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यावर पहिल्या अपघाताची नोंद झाली आहे.
संबंधित बातम्या